- आकुर्डीतील शाळेत शिकणाऱ्या मुलांचे आरोग्य धोक्यात..
- जनधिकार संघटनेने दिलाय आंदोलनाचा इशारा…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. २९ जुलै २०२४) :- पिंपरी चिंचवड शहरात सध्या डेंग्यूची साथ मोठया प्रमाणावर पसरली आहे. याबाबत महापालिकेने शहरातील नागरिकांना घरासह आजूबाजूच्या परिसरात स्वच्छता राखण्याचे आवाहन केले आहे. असे असताना दुसरीकडे नागरिकांचे आरोग्य धोक्यात घालण्याचा उद्योग सुरु आहे.
आकुर्डीतील ज्ञानेश्वर कॉलनी येथे मदरसा मुस्लिम शाळा आहे. तेथे ड्रेनेजलाईन अभावी स्वच्छतागृहावर ताण येत आहे. त्यामुळे दुर्गंधीयुक्त पाणी तुंबत आहे. डबक्यांमध्ये पाणी साचल्यामुळे परिसरात डासांचे प्रमाण वाढत आहे. रोगराईचा धोका आहे.
शाळेतील मुलांच्या आरोग्याचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. याबाबत आरोग्य अधिकाऱ्यांशी संपर्क साधून त्यांना घटनेची सविस्तर माहिती दिली. दुर्गंधीयुक्त पाणी काढण्यासाठी स्वच्छता वाहन पाठविण्याची विनंती केली. आजपर्यंत ते वाहन पाठविण्यात आले नाही. त्यामुळे वैतागून पालिकेच्या सारथी हेल्पलाइन आणि
महापालिका आयुक्तांकडे याबाबत तक्रार केली आहे. पालिका प्रशासनाने तक्रारीची योग्य ती दखल न घेतल्यास आंदोलनाचा मार्ग जवळ करू, असा इशारा जनधिकार संघटनेचे अध्यक्ष मजीद शेख यांनी निवेदनाद्वारे दिला आहे.
















