- पुणे आणि पिंपरी चिंचवड महापालिकांची फसवणूक…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. ०४ ऑगस्ट २०२४) :- पुणे महापालिकेच्या पावतीवर खाडाखोड करून पिंपरी चिंचवड महापालिकेची मृत जनावरांची विल्हेवाट लावण्याचे काम दिलेल्या ठेकेदाराने एक लाख २२ हजार रुपयांची फसवणूक केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. या कंपनीवर गुन्हा दाखल करण्याचे पत्र पिंपरी चिंचवड महापालिकेने पुणे महापालिकेला दिले आहे. त्याबाबत विधी विभागाकडे अभिप्राय मागविण्यात आला आहे.
पिंपरी चिंचवड शहरातील मोठी मृत जनावरे उचलणे व विल्हेवाट लावण्याचे काम पुण्यातील दिल्लीवाला अँड सन्स या कंपनीला देण्यात आले होते. शहरातील मृत जनावरे लोकवस्तीपासून दूर असलेल्या मोकळ्या जागेत दफन केली जातात. मात्र जनावर दफन करण्यात येणारी जागा ‘एमआयडीसी’कडे हस्तांतर करण्यात आली. त्यामुळे पिंपरी चिंचवड शहरातील मृत जनावरे पुणे महापालिकेच्या परवानगीने ‘नायडू पॉड’ येथे मोठ्या जनावरांचे दहन इन्सिनेटर मशीनमध्ये केले जात होते. एका जनावरासाठी तीन हजार रुपये पुणे महापालिकेकडून शुल्क आकारले जात होते.
येथील इन्सिनेटर महापालिकेच्या विद्युत विभागाने उभा केला आहे. त्यामुळे येथील शुल्काच्या पावत्या विद्युत विभागामार्फत दिल्या जात होत्या. तर मिळणारे शुल्क आरोग्य विभागात जमा केले जात होते.
पुणे महापालिकेने दिलेल्या पावतीवर खाडाखोड करून दिल्लीवाला अँड सन्स कंपनी पिंपरी चिंचवड महापालिकेकडून जास्त पैसे उकळत असल्याचे समोर आले. त्यामुळे पिपरी चिंचवड महापालिकेने कंपनीला काळ्या यादीत टाकले. पिंपरी चिंचवड महापालिकेने पुणे महापालिकेला पत्र देऊन संबंधित कंपनीवर गुन्हा दाखल करण्याच्या सूचना केल्या आहेत. मात्र, हा गुन्हा कुणी दाखल करायचा हा प्रश्न निर्माण झाला आहे.
इन्सिनेटर आरोग्य विभागाच्या ताब्यात आहे. त्यामुळे आरोग्य विभागाने गुन्हा दाखल करावा, असे विद्युत विभागाचे मत आहे. तर पावती देण्याचे काम विद्युत विभागाकडे असल्याने त्यांनी गुन्हा दाखल करावा, असे आरोग्य विभागाचे मत आहे. अखेर आरोग्य विभागाने यासंदर्भात विधी विभागाकडे अभिप्राय मागितला आहे.












