- बंगला, गाडीवाल्या पालकांचं उत्पन्न लाखभर कसं?..
- वंचितांचा ‘मोफत शिक्षणाचा हक्क का मारताय?…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. ०६ ऑगस्ट २०२४) :- मोफत शिक्षण हक्क कायद्यांतर्गत येत्या शैक्षणिक वर्षासाठीचे २५ टक्के आरक्षित जागांसाठी प्रवेश सुरू आहे. या वेळी कागद पडताळणीनंतर प्रवेश दिल्यानंतर बहुतांश पालक हे सधन असूनही आरटीईअंतर्गत पाल्याचा प्रवेश घेऊन आर्थिक दुर्बल घटकांतील मुलांचा हक्क हिरावून घेत आहेत, असे कागदपत्र पडताळणीत निदर्शनास आले आहे. सधन पालकांकडून आरटीई कायद्याचा गैरफायदा घेतला जात आहे. त्यामुळे खरे आर्थिक दुर्बल घटकातील पालक हे अद्याप प्रवेशापासून वंचितच आहेत.
आरटीई कायद्यानुसार पहिली ते आठवीच्या विद्यार्थ्यांना खासगी, अनुदानित विनाअनुदानित शाळांतही गरीब व गरजू विद्यार्थ्यांना प्रवेश मिळावा यासाठी शासनाने २५ टक्के प्रवेश राखीव ठेवले आहेत. ज्यांचे उत्पन्न एक लाखाच्या आत असेल, अशाच पालकांना आपल्या पाल्यांचा आरटीई प्रवेशासाठी अर्ज करता येती: मात्र याठिकाणी काही पालकांनी आर्थिक दुर्बल घटकात नसनाही त्यांनी खोटी कागदपत्रे सादर करून आरटीईअंतर्गत प्रवेश मिळविण्या प्रयत्न करत आहेत. शासनाच्या नियमानुसार प्रवेशानंतर जर एखादा पालक फेर तपासणीमध्ये सधन आढळला आणि त्याने आरटीई प्रवेशाचा लाभ घेवला असेल तर भविष्यात तो प्रवेश रद्द होऊ शकतो. त्यामुळे आरटीईअंतर्गत जी माहिती किंवा कागदपत्रे प्रवेशासाठी सादर केली जातील, ती खरी असावीत. याबाबतचे सर्व आदेश निर्देश शासनाने पालकांना दिले आहेत, तरी याकडे पालक कानाडोळा करून प्रवेशाचा लाभ घेत आहेत.
शासनाची आरटीई ही योजना आर्थिक दुर्बल घटकांसाठी आहे. अशा प्रकारे सधन पालक आरटीईचा लाभ घेत असतील तर आर्थिक दुर्बल घटकांपर्यंत खरेच हा लाभ पोहचणार का, असा प्रश्न उपस्थित होत आहे. आर्थिक दुर्बल घटकांतील अनेकांचे पाल्य अजूनही प्रवेशापासून वंचित आहेत. मात्र, ज्यांनी गरजवंत नसतानाही अर्ज भरला अशा सधन पालकांच्या पाल्यांना आरटीई अंतर्गत प्रवेश मिळाले आहेत. हा उपक्रम वंचित व आर्थिक दुर्बल घटकांसाठी राबविला जात असताना सधन पालकांकडून जाणूनबजून त्यांचा हक्क हिरावून घेतला जात आहे.
आरटीई प्रवेश हा आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांसाठी आहे. त्यामुळे कोणत्याही जातीमधील एक लाखाच्या आत उत्पन्न असलेली व्यक्ती पाल्याचा प्रवेश आरटीईतून करू शकते. हा जातीनिहाय प्रवेश नसून आर्थिक स्तरावर दिला जाणारा प्रवेश असताना काही पालकांनी खोटे जात प्रमाणपत्र देखील सादर केले आहे. तसेच काही महिलांनी विवाहीत असतानाही विधवा कॅटेगरीतून अर्ज केला आहे. त्यामुळे कागदपत्रांच्या फेरतपासणीमध्ये पालक खोटी कागदपत्रे सादर करताना आढळत आहेत.
आमच्या स्तरावर कागदपत्रांची तपासणी करत आहोत. त्यामुळे खोटी कागदपत्रे असणाऱ्या पालकांचे प्रवेश रद्द करण्यात येत आहेत.
– संगीता बांगर – प्रशासन अधिकारी, पिं.चि. मनपा…











