- सहा वर्षांचा काळ लोटला; रुग्णालय तातडीने सुरू होणे गरजेचे…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. ०६ ऑगस्ट २०२४) :- चिंचवडगाव येथील तालेरा रुग्णालयाच्या नवीन इमारतीचे काम संथ गतीने सुरू आहे. सहा वर्षांपासून रुग्णालयाचे काम सुरू आहे. अद्याप रुग्णालय सुरू झालेले नाही. सध्या इमारतीची रंगरंगोटी सुरु आहे. आवश्यक फर्निचर, विद्युतविषयक विविध कामे आणि ऑपरेशन थिएटरचे काम सध्या सुरू आहे. त्याचप्रमाणे, रुग्णालयासाठी आवश्यक वैद्यकीय सामग्रीची व्यवस्था केली जात आहे. हे रुग्णालय कधी सुरू होणार? असा प्रश्न उपस्थित होत आहे.
वाढत्या महागाईमुळे वैद्यकीय सेवा सुविधाही दिवसेंदिवस महाग होत आहेत. वैद्यकीय सुविधा आणि उपचार सर्वसामान्य नागरिकांच्या बजेटबाहेर जात असल्यामुळे महापालिकेच्या रूग्णालयात नागरिकांची उपचारासाठी पसंती असते. त्यामुळेच महापालिकेच्या वायसीएम, थेरगाव, आकुर्डी, पिंपरीतील जिजामाता, भोसरी या मोठ्या रूग्णालयासह सर्वच दवाखान्यात मोठी गर्दी असते.
महापालिकेच्या तालेरा रुग्णालयाची जुनी इमारत पाडून तेथे नवीन पाच मजली रुग्णालय इमारत उभारण्यात आली आहे. रुग्णालयात बाह्य रुग्ण विभाग १२, तपासणी कक्ष, क्ष-किरण तपासणी कक्ष, ३६ खाटांचा पुरुष व महिलांचा मेडिकल वॉर्ड, चार अद्ययावत ऑपरेशन थिएटर कॉम्प्लेक्स, १६ खाटांचे कान-नाक-घसा व नेत्र विभाग, २० खाटांचा अस्थिरोग विभाग, २४ तास फार्मसी, आपत्कालीन ऑपरेशन थिएटर कॉम्प्लेक्स, आपत्कालीन अतिदक्षता विभाग, १०० आसन व्यवस्था असलेले सभागृह, दुचाकी आणि चारचाकी वाहनांसाठी पार्किंगची व्यवस्था असणारे सुसज्ज रुग्णालय असणार आहे.
१ मार्च २०१८ रोजी कामाचे आदेश दिल्यानंतर रुग्णालयाचे कामकाज सुरू करण्यात आले आहे. नवीन रुग्णालय इमारतीत मल्टीस्पेशालिटी सुविधा सुरू करण्याचे महापालिका प्रशासनाचे नियोजन आहे. मात्र रुग्णालायचे काम संथगतीने सुरू असल्याचे चित्र आहे. चिंचवडगाव, काळेवाडी, केशवनगर, काकडे पार्क, वेताळनगर, वाल्हेकरवाडी, थेरगाव अशा विविध परिसरातून चिंचवडगाव येथे महापालिकेच्या वतीने सुरू असलेल्या क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले रुग्णालयात उपचार केले जातात. मात्र, रूग्णसेवेचा वाढता ताण लक्षात घेता या रुग्णालयाशेजारीच उभारलेल्या नवीन इमारतीत रुग्णालय तातडीने सुरू होणे गरजेचे आहे. नवीन इमारतीत पुर्ण क्षमतेने रुग्णालय सुरू झाल्यास त्याचा परिसरातील नागरिकांना फायदा होणार आहे.