न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. ०७ ऑगस्ट २०२४) :- शहरातील पूरग्रस्तांची विचारपूस करण्यासाठी शहरात आलेल्या मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नजरेत रस्त्यांची दुरवस्था आणि खड्डे लपविण्यासाठी केलेली डागडुजी लपू शकली नाही. त्यातच खड्ड्यांमुळे झालेल्या वाहतूक कोंडीत अडकल्याने मुख्यमंत्री यांनी महापालिका आयुक्त शेखर सिंह यांना चांगलेच खडेबोल सुनावले. त्यानंतर आयुक्त सिंह यांनी मंगळवारी (दि. ६) विभागप्रमुखांची बैठक घेऊन अधिकाऱ्यांची चांगलीच खरडपट्टी काढली. खड्डे त्वरीत बुजवून अहवाल सादर करण्याचे आदेश अधिका-यांना दिले.
महापालिकेकडून दर वर्षी पावसाळ्यापूर्वी खड्डे बुजविल्याचे दावे केले जातात. प्रत्यक्षात रस्त्याची चाळण होते. रस्ते खोदाईस १५ मेनंतर परवानगी दिली जात नसल्याचे सांगितले जाते. मात्र, अत्यावश्यक कामांच्या नावाखाली पावसाळ्यात बिनधास्तपणे खोदाई सुरू असते. सध्या तर महापालिकेच्या मुख्यालयासमोरच खोदाई सुरू आहे. अगोदर खड्ड्यांमुळे वाहनचालक त्रस्त असताना त्यात खोदाईमुळे अरुंद झालेल्या रस्त्यांची भर पडते. परिणामी, गेल्या काही दिवसांपासून शहरातील विविध भागांत सातत्याने प्रचंड वाहतूक कोंडी होत आहे.
शहरातील रस्त्यांवर दरवर्षी पावसाळ्यात खड्डे पडतात. हे खड्डे खुद्द मुख्यमंत्र्यांच्या नजरेतून सुटले नसल्याने महापालिकेचे पितळ उघडे पडले आहे. त्यामुळे मुख्यमंत्र्यांनी आयुक्तांची चांगलीच झाडाझडती घेऊन खड्ड्यांबाबत जाब विचारला. त्यावर उत्तरे देता देता आयुक्तांना नाकी नऊ आल्याचे समजते.
मुख्यमंत्री येणार कळताच त्यांच्या मार्गात येणाऱ्या बहुतेक रस्त्यांची लगबगीने दुरुस्ती करण्यात आली होती. परंतु ही तात्पुरती डागडुजी आणि लीपापोती मुख्यमंत्र्यांच्या तातडीने लक्षात आली. खुद्द मुख्यमंत्र्यांनी जाब विचारल्याने खुलासा करताना आयुक्तांची चांगलीच पंचाईत झाली. अधिकाऱ्यांमुळे झालेल्या या पंचायतीचा आयुक्त शेखर सिंह यांनी मंगळवारी झालेल्या साप्ताहिक स्थायी समिती सभेत वचपा काढला. काम न करणाऱ्या अधिकाऱ्यांची आयुक्तांनी चांगलीच झाडाझडती घेतली. आयुक्तांनी स्थापत्य विभागाबरोबरच क्षेत्रीय अधिका-यांना शहरातील रस्त्यावर पडलेले खड्डे तातडीने बुजवून अहवाल सादर करण्याचे आदेश दिले आहेत.














