- संगणक प्रणालीचे कर्मचाऱ्यांनी गिरविले धडे…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. ०९ ऑगस्ट २०२४) :- पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या अधिकारी कर्मचाऱ्यांना माहितीचा अधिकार अधिनियम २००५ संबंधित जीआयएस एन्बल्ड इआरपी (GIS Enabled ERP) अंतर्गत नव्याने विकसित करण्यात आलेल्या संगणक प्रणालीचे प्रशिक्षण देण्यात आले.
माहितीच्या अधिकाराअंतर्गत नागरिकांना सुलभ पद्धतीने माहिती मिळविण्यासाठी ऑनलाईन पद्धतीने अर्ज स्वीकृती, छाननी आणि माहिती उपलब्ध करून देण्यासाठी नव्याने विकसित करण्यात आलेल्या संगणक प्रणालीचे प्रशिक्षण सत्र चिंचवड येथील ऑटोक्लस्टर येथे पार पडले.
यावेळी पिंपरी चिंचवड स्मार्ट सिटीचे मुख्य माहिती व तंत्रज्ञान अधिकारी नीळकंठ पोमण, सह मुख्य कार्यकारी अधिकारी किरणराज यादव, माहिती व तंत्रज्ञान अधिकारी अनिता कोटलवार यांच्यासह विविध विभागांचे जनमाहिती अधिकारी, अपिलीय अधिकारी, कर्मचारी उपस्थित होते. एवीडेन इंडिया प्रायवेट लिमिटेड या संस्थेच्या वतीने संगणक प्रणाली विकसित करण्यात आली असून त्यांच्याद्वारे प्रशिक्षण देण्यात आले आहे.
माहितीच्या अधिकारांतर्गत माहितीची देवाण घेवाण सुलभ, जलद व ऑनलाईन पद्धतीने करण्यासाठी ही संगणक प्रणाली विकसित करण्यात आली आहे. या प्रणालीचे प्रशिक्षण सामान्य प्रशासन विभाग, कर संकलन, लेखा, लेखापरीक्षण, आरोग्य, वैद्यकीय, स्थापत्य, विद्युत यासह विविध विभागातील अधिकारी व कर्मचाऱ्यांना सकाळी आणि दुपारी दोन सत्रात हे प्रशिक्षण देण्यात आले.














