न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. २७ ऑगस्ट २०२४) :- महापालिकेच्या कर आकारणी व संकलन विभागाने थकबाकीमुळे जप्त केलेल्या ५३ मालमत्तांचा लिलाव करण्याची घोषणा केली आहे. वारंवार नोटिसा व जप्तीची कारवाई करूनही थकीत कराचा भरणा न केल्यामुळे करसंकलन विभागाने हा कारवाईचा बडगा उगारला आहे.
महापालिका कार्यक्षेत्रातील मालमत्ताधारकांनी दरवर्षी मिळकत कर भरणे आवश्यक आहे. मात्र, काही मालमत्ताधारक अनेक वर्षे मालमत्ता कर भरत नाही. त्यांची थकबाकी वाढली आहे. त्यांच्यापैकी काही मालमत्ताधारक जप्तीच्या नोटिसा व कारवाईचा इशारा दिल्यानंतर कराचा भरणा करत आहेत. मात्र, त्या मालमत्ताधारकांनी नोटिसा दिल्यानंतरही कराचा भरणा केला नाही. त्यामुळे महापालिका अधिनियमातील तरतुदींनुसार जप्त केलेल्या ८८ मालमत्तांचा लिलाव करण्याची प्रक्रिया सुरू करण्यात आली होती. ही प्रक्रिया सुरू केल्यानंतर ३५ जणांनी थकीत कराचा भरणा केला आहे. त्यानंतर करसंकलन विभागाने पुन्हा उर्वरित ५३ मालमत्तांच्या लिलावाची प्रक्रिया सुरु केली आहे.
थकबाकी न भरणाऱ्या मालमत्तांवर जप्तीची कारवाई करून त्यांचा लिलाव काढण्यात आला आहे. लिलाव प्रक्रियेमध्ये सहभागी होणाऱ्यासाठी महापालिकेच्या करसंकलन विभागात १३ सप्टेंबर २०१४ पर्यंत दुपारी तीन वाजेपर्यंत आधारकार्ड, पॅन कार्ड यांच्या प्रतींसह लेखी अर्जाद्वारे नोंदणी करावी.
– नीलेश देशमुख, सहायक आयुक्त, पिंपरी-चिंचवड महापालिका…












