न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. २७ ऑगस्ट २०२४) :- राज्यातील महानगरपालिकेच्या कायम व कंत्राटी कामगारांच्या विविध प्रलंबित मागण्यांसाठी बुधवारी (दि. २८) रोजी राज्य शासनाचे लक्ष वेधण्यासाठी राज्य मनपा कामगार कर्मचारी संघटना फेडरेशनच्या वतीने आझाद मैदान, मुंबई येथे प्रचंड धरणे निर्दशने आंदोलन करण्यात येत आहे.
’ड’ वर्ग महानगरपालिका कर्मचा-यांच्या मासिक वेतनावर नगरपालिका कर्मचा-यांच्या वेतनाप्रमाणे १०० टक्के वेतन अनुदान द्यावे. राज्यातील महानगरपालिका कर्मचा-यांना जुनी पेन्शन योजना लागू करणे, राज्यातील मनपा कर्मचा-यांना १०/२०/३० वर्षे सेवा झालेल्या कर्मचा-यांना आश्वासीत प्रगती योजना लागू करणे. राज्यातील मनपा अंतर्गत रोजंदारीवर काम करणा-या कर्मचा-यांना सेवेत कायम करणे. राज्यातील मनपा अंतर्गत कायम कर्मचा-यांना दिपावली-२०२४ निमित्त बक्षिस मिळणे व कंत्राटी कर्मचा-यांना दिपावली-२०२४ निमित्त ८.३३ टक्के सानुग्रह अनुदान देण्यात यावे. राज्यातील मनपा अंतर्गत कंत्राटी स्वच्छता व इतर विभागात काम करणा-या कामगारांना कर्नाटक राज्याच्या धोरणानूसार महाराष्ट्र राज्यामध्ये कायम करावे किंवा कायम कामगारांएवढे समान काम समान वेतन द्यावे. महाराष्ट्र राज्यातील महानगरपालिका, नगरपालिका मधील लाड-पागे समितीच्या शिफारशीनुसार वारसाहक्काने नेमणूका बाबत मा. उच्च न्यायालय, औरंगाबाद खंडपीठामध्ये प्रलंबित असलेल्या याचिके संदर्भात राज्य सरकारने उपसमिती नेमून वाल्मिकी, मेहतर, भंगी, अनुसूचित जाती संवर्गा व्यतीरिक्त इतर संवर्गातील वारसांना नेमणूक देणेसाठी पुढील कार्यवाही तात्काळ करावी. राज्यातील पुणे, पिंपरी चिंचवड व इतर मनपा अंतर्गत परिवहन संस्थेमधील कर्मचा-यांना व इतर कर्मचा-यांना सातवा वेतन आयोगाच्या फरकाची रक्कम तात्काळ अदा करण्यासाठी संबंधित यंत्रणेला निर्देशित करावे. राज्यातील सर्वच महानगरपालिका-नगरपालिका कर्मचा-यांना पुर्वीची जुनी पेन्शन योजना लागु करावी. कायमस्वरुपी अपंगत्व व दुर्धर आजाराने ग्रस्त असणा-या कर्मचा-यांच्या वारसांना नियुक्ती देणेत यावी. राज्यातील ज्या महानगरपालिका-नगरपालिकांचा आकृतीबंध राज्य शासनाकडे मंजुरीकामी पाठविण्यात आला आहे तो आकृतीबंध सर्वसमावेशक असावा व त्यास तात्काळ शासन मंजुरी देण्यात यावी.
या मागण्यांची पूर्तता करणे व लक्ष वेधण्यासाठी मनपा कामगार कर्मचारी संघटना फेडरेशनच्या वतीने धरणे निदर्शने आंदोलन करण्यात येणार आहे, अशी माहिती महाराष्ट्र राज्य महानगरपालिका कामगार कर्मचारी संघटना फेडरेशनचे अध्यक्ष श्री. शशिकांत ऊर्फ बबनराव झिंजुर्डे यांनी दिली.