न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. २७ ऑगस्ट २०२४) :- पिंपरी चिंचवड महापालिकेच्या हद्दीतील कचरावेचक व्यक्तींच्या पाल्यांसाठी शैक्षणिक अर्थसहाय्य देण्याच्या विषयासह महापालिका सभा आणि स्थायी समिती सभेची मान्यता आवश्यक असलेल्या विविध विषयांना प्रशासक शेखर सिंह यांनी आज झालेल्या बैठकीत मान्यता दिली.
पिंपरी येथील महापालिकेच्या मुख्य प्रशासकीय भवनामध्ये पार पडलेल्या या बैठकीस अतिरिक्त आयुक्त प्रदीप जांभळे पाटील, विजयकुमार खोराटे, अतिरिक्त आयुक्त तथा नगरसचिव चंद्रकांत इंदलकर तसेच विषयाशी संबंधित विभागप्रमुख आणि अधिकारी उपस्थित होते.
बैठकीतील मंजूर विषय :-
महापालिका परिसरातील शालेय व महाविद्यालयीन विद्यार्थी खेळाडूंना क्रीडा शिष्यवृत्ती अदा करणे, शहराच्या सौंदर्यीकरणात भर टाकणाच्या दृष्टीने सुशोभीकरणाची कामे करणे, भोसरी येथील राजमाता जिजाऊ उड्डाणपुलाखालील रस्त्याची स्थापत्य विषयक देखभाल दुरुस्तीची कामे करणे, मनुष्यबळ तसेच यांत्रिकी पद्धतीने दैनंदिन साफसफाई व स्वच्छतेचे कामकाज करण्यासाठी आवश्यक साहित्य उपलब्ध करून देणे आदी विषयांसह तरतूद वर्गीकरणाच्या विषयांना प्रशासक शेखर सिंह यांनी आज झालेल्या बैठकीत मान्यता दिली.











