- महापालिकेचा सुरक्षित शाळेचा दिलासा फोल..
- मुलींच्या छेडछाडीचे सर्रास प्रकार; पालिकेसह शाळेचेही दुर्लक्ष…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. २७ ऑगस्ट २०२४) :- फुगेवाडीतील महापालिकेची प्राथमिक माध्यमिक शाळा सीसीटीव्ही अभावी असुरक्षित बनली आहे. शाळेच्या इमारतीचे बांधकाम चालू असताना शाळेच्या भिंतीवरील सीसीटीव्ही कॅमेरा काढून ठेवण्यात आले होते. ते अद्यापही बसविण्यात आले नाहीत.
शाळेचे कॅमेरे बंद असल्यामुळे मुलींची सुरक्षितता धोक्यात आली आहे. लहान मुले या धोक्याला बळी पडू शकतात. प्रशासन याकडे दुर्लक्ष करीत आहे. त्या शाळेखाली असणारे आणखी चार कॅमेरे बंद अवस्थेत आहेत. महापालिका शाळेतील मुख्यध्यापकांच्या कार्यालयातील डिस्प्लेही बंद अवस्थेत आहे.
तसेच शाळेच्या समोर विद्यार्थ्यांना ये-जा करण्यासाठी बोगदा आहे. त्या बोगद्यात मुलींच्या छेडछाडीचे प्रकार सर्रास घडत आहेत. त्या बोगद्यात बाहेरील मुले येऊन थांबतात. ‘आमच्या मुली सुरक्षित नाहीत; आम्हला भीती वाटते’, अशा तक्रारी काही पालकांनी शाळेच्या मुख्याध्यापकांकडे केल्या आहेत. तरीही शाळेला आणि पालिका प्रशासनाला जाग येत नाही. त्यामुळे मुलींमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.
बंद कॅमेऱ्याची महापालिकेच्या सारथीवर अनेकवेळा तक्रार केली. परंतु हा कॅमेरा आमच्या मार्फत लावला नाही? तो कोणी बसवला आहे माहित नाही? हे आमचे काम नाही? अशी टोलवाटोलवीची उत्तरे स्मार्ट सिटी आणि महापालिका विभाग देत आहे. मी अनेकवेळा महापालिकेत आणि जनसंवाद सभेत ही तक्रार मांडली. मात्र, अधिकारी हे प्रकरण आमच्या विभागाशी संबंधित नाही, असे टोलवाटोलवीची उत्तरे देत आहेत. तसेच बोगद्याबाबतही तक्रारी केल्या आहेत.
– यलप्पा वालदोर, आम आदमी पार्टी, अध्यक्ष माहिती अधिकार आघाडी, पिं. चिं. शहर…