न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. ८ मे २०१९) :- पिंपरी चिंचवड शहराला पाणीपुरवठा करणा-या पवना धरणातील पाणी पातळी खालावत आहे. त्यामुळे पिंपरी चिंचवड महानगरपालिकेने पाणीकपात करून, शहराला दिवसाआड पाणीपुरवठा करण्याची घोषणा केली आहे. परंतु, पाणी टंचाईवर मात करण्यासाठी तातडीने पिंपरी-चिंचवड शहरात जलतरण तलाव, बांधकामे आणि वॉशिंग सेंटर यांना पुरविला जाणारा पाणीपुरवठा बंद करावा, अशी मागणी शिवसेना भोसरी विभाग प्रमुख प्रदीप चव्हाण यांनी महापालिका आयुक्त श्रावण हर्डीकर व पाणीपुरवठा विभागाचे सह शहर अभियंता यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे.
त्यात त्यांनी म्हटले आहे की, पिंपरी चिंचवड शहराला पाणीपुरवठा करणा-या पवना धरणात पाण्याची पातळी खालावली असल्यामुळे शहरात (६ मे) पासून एक दिवसाआड पाणीपुरवठा करण्याचा निर्णय पालिका प्रशासनाने घेतला आहे. पवना धरणात २९ टक्के साठा राहीला आहे. हा साठा ३० जूनपर्यंत परेसा ठरणार आहे. पावसाळा लांबणीवर पडणार आहे, याचा अंदाज घेऊन ही पाणी कपात करण्यात येत आहे. २० टक्के पाणी बचत होऊन धरणातील पाणीसाठा १५ जुलैपर्यंत पुरेल. परंतु, पाऊस लांबणीवर जाण्याची शक्यता वर्तविली गेलेली आहे. त्यामुळे येते दोन महिने पाणीटंचाईच्या दृष्टीने कठीण आहेत. त्यामुळे टंचाईवर मात करण्यासाठी पिंपरी चिंचवड महानगरपालिकेने उपाययोजना करणे गरजेचे आहे.
महापालिकेच्या वतीने नेहरुनगर, भोसरी, थेरगाव, केशवनगर, मोहननगर, पिंपळे गुरव, सांगवी, कासारवाडी, यमुनानगर, संभाजीनगर, पिंपरीगाव, प्राधिकरण-निगडी, असे तेरा जलतरण तलाव सुरू आहेत. सर्वच तलावावरील बोअरिंग बंद असल्याने पिण्याचे पाणी वापरले जात असल्याचे आमच्या निदर्शनास आले आहे. उन्हाळी सुट्टयामुळे मुले, तरूण व नागरिक त्याचा लाभ घेतात. तेथील टॅक, शॉवर, नळ व स्वच्छतागृहातही पिण्याचे पाणी वापरले जाते. त्यामुळे दररोज लाखो लिटर पाणी या तलावांमध्ये खर्च पडत आहे.
त्याबरोबर शहरातील मोठमोठ्या बांधकामानां पाणी पुरवठा सुरू आहे. बिल्डर्सच्या मोठमोठ्या साईट शहराच्या विविध भागात सुरू आहेत. बहुतेक साईटला महापालिकेचाच पाणीपुरवठा असल्याचे निदर्शनास आलेले आहे. टेंकरद्वारेही पाणीपुरवठा केला जातो. त्यामुळे रोज लाखो लीटर पाणी बांधकामावर खर्च होते. त्याचा विचार करता शहरातील जलतरण तलाव व बांधकामांसाठी दिले जाणारे पाणी बंद करावे. तसेच शहरात वॉशिग सेंटरची संख्या मोठी आहे. वॉशिग सेंटर्सच्या माध्यमातून रोज हजारो लिटर पाणी वापरले जाते. उन्हाळ्याचे दिवस लक्षात घेता वॉशिंग सेंटर्सचे पाणी बंद करणे गरजेचे आहे. तसेच, महानगरपालिकेच्या पाणीपुरवठा यंत्रणेतीलही मोठ्या प्रमाणात पाणी वाया जाते. तेही नियंत्रित करण्यासाठी तातडीने उपापयोजना राबवाव्यात, असे या निवेदनात प्रदिप चव्हाण यांनी म्हटले आहे.











