न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. ८ मे २०१९) :- स्वत:ची क्षमता ओळखून स्पर्धा परीक्षेला सामोरे जावे. अपयशाने खचून न जाता पुन्हा जिद्दीने अभ्यास करून यश नक्की मिळविता येते, असा गुरुमंत्र आयएएस अधिकारी तृप्ती धोडमिसे-नवत्रे यांनी दिला.
चिंचवडगावातील गांधी पेठ तालीम मित्र मंडळाच्या वतीने आयोजित जिजाऊ व्याख्यानमालेचे हे २८ वे वर्ष आहे. दुसरे पुष्प गुंफताना धोडमिसे यांची मुलाखत स्नेहा गायकवाड यांनी घेतली. यावेळी स्नेहा गायकवाड, गीतल गोलांडे, स्वामी विवेकानंद केंद्राच्या अनुराधा मराठे, शिल्पा वाघोले, मानसी चिटणीस, माजी नगरसेवक राजाभाऊ गोलांडे, गजानन चिंचवडे, सुहास पोफळे आदी उपस्थित होते.
धोडमिसे-नवत्रे पुढे म्हणाल्या की, आजकाल मुलं दहावी-बारावीत असतानाच प्रशासकीय सेवेत जाण्याचे निश्चित करतात. परंतू, मला इंजिनिअरिंग पूर्ण होईपर्यंत युपीएससी विषयी जास्त माहिती नव्हती. इंजिनिअरिंग पूर्ण झाल्यानंतर मी लार्सन ॲण्ड टर्बो कंपनीत एचआर म्हणून काम केले. वयाच्या २३ व्या वर्षी ध्येयनिश्चितीचा मार्ग सापडला. लग्नानंतर मी दुस-या प्रयत्नात नोकरी करतानाच एमपीएससी पास झाले. त्यानंतर मिळालेल्या पदावर नोकरी करीत असतानाच यूपीएससीची देखील तयारी सुरु केली.
माझे आई वडील शिक्षक असल्यामुळे मला अभ्यासाची आवड होती. पुण्यात माध्यमिक व अभियांत्रिकीचे शिक्षण व नंतरची नोकरी केल्यामुळे पुण्यातील वातावरणाची सवय झाली होती. यूपीएससीच्या पहिल्या प्रयत्नात चार मार्काने माझे रँकिंग गेले. पुन्हा नोकरी करीत असतानाच प्रयत्न केला. परंतू साधी प्रिलियम देखील पास होऊ शकले नाही. मानसिकदृष्ट्या खचून न जाता या वेळी माझे पती व सासू सासरे यांनी प्रोत्साहन दिले आणि पुन्हा तिस-या प्रयत्नात युपीएससीला निवड झाली. अनेक मुले-मुली यूपीएससी जमले नाही म्हणून एमपीएससीला येतात. परंतू, माझे एमपीएससी अगोदर झाल्यामुळे माझे फाऊंडेशन मजबूत झाले होते. एमपीएससीला माध्यमाचे बंधन नसते. अत्याधुनिक तंत्रज्ञान उपलब्ध असल्यामुळे आता क्लासेससाठी दिल्लीत जाण्याची गरज नाही. इंटरनेटव्दारे घरात बसून देखील टेस्ट सिरीज देता येतात. इंटरनेटवर याबाबत अनेक मोटीव्हेशनल व्हिडिओ, मुलाखती असून त्याचादेखील स्पर्धा परीक्षांना चांगला उपयोग होतो, असेही त्यांनी सांगितले.
शुक्रवारी (१० मे २०१९) सायं. ७ वाजता गुरुदासी विजयालक्ष्मी शिरगावकर यांचे सती मंदोदरी या विषयावर व्याख्यान होणार आहे. तसेच या वेळी प्रज्ञा पिसोळकर यांना जिजाऊ पुरस्कार, हेमंत वसंत कुंभोजकर यांना क्रांतीवीर चापेकर पुरस्कार आणि कस्तुकरी कल्लपा जमखंडी यांना श्री चिंतामणी पुरस्कार देऊन गौरविण्यात येणार आहे. प्रज्ञा पिसोळकर यांना वृक्ष लागवडीचा छंद असून त्या कनेक्टींग या संस्थेत समुपदेशक म्हणून काम पाहत आहेत. कनेक्टींग ही संस्था आत्महत्या करणा-या व्यक्तीस व आत्महत्येच्या प्रयत्नातून वाचलेल्या व्यक्तींसाठी समुपदेशनाचे काम करते.
हेमंत कुंभोजकर हे अंध असून त्यांच्या नावे लिम्का बुक ऑफ रेकॉर्ड सलग ३४ तास मसाज करण्याचे भारतीय मसाज विक्रमाची नोंद आहे. कस्तुरी कल्लपा जमखंडी या जोगेश्वरी महिला भजनी मंडळाच्या प्रवर्तक असून शहरातील अनेक धार्मिक उत्सवात त्यांनी भजनसादर केली आहे. तसेच त्यांच्या मार्गदर्शनाखाली अनेक महिला भजनी मंडळ तयार झाले आहेत.
स्वागत गीतल गोलांडे व प्रास्ताविक अनुराधा मराठे यांनी तर सुत्रसंचालन मानसी चिटणीस यांनी केले. आभार शिल्पा वाघोले यांनी मानले.


















