न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. १८ सप्टेंबर २०२४) :- यंदाच्या गणेशोत्सवात महापालिकेच्या वतीने विविध विसर्जन घाटांवर तसेच मुर्ती संकलन केंद्रांवर सुमारे २५० मेट्रिक टन इतके निर्माल्य संकलित करण्यात आले असल्याची माहिती अतिरिक्त आयुक्त विजयकुमार खोराटे यांनी दिली.
पिंपरी चिंचवड महापालिकेच्या वतीने यंदाचा गणेशोत्सव पर्यावरणपूरक गणेशोत्सव साजरा करण्याबाबत नागरिकांना आवाहन करण्यात आले होते. या आवाहनास नागरिकांनी प्रचंड प्रतिसाद दिला असून नागरिकांनी निर्माल्य निर्माल्य कुंडामध्ये टाकण्यास प्राधान्य दिले. ७ सप्टेंबर ते १८ सप्टेंबर या कालावधीत क्षेत्रीय कार्यालय स्तरावर निर्माल्य संकलित करण्यासाठी निर्माल्य कुंडांची व्यवस्था करण्यात आली होती. तसेच हे निर्माल्य संकलित करण्यासाठी आरोग्य कर्मचाऱ्यांचीही नियुक्ती करण्यात आली होती.
त्यानुसार अ क्षेत्रीय कार्यालयाच्या हद्दीत २४.४५ मेट्रिक टन, ब क्षेत्रीय कार्यालयाच्या हद्दीत ५४.६९ मेट्रिक टन, क क्षेत्रीय कार्यालयाच्या हद्दीत ३१.३९ मेट्रिक टन, ड क्षेत्रीय कार्यालयाच्या हद्दीत ३१.७० मेट्रिक टन, इ क्षेत्रीय कार्यालयाच्या हद्दीत ३४.११ मेट्रिक टन, फ क्षेत्रीय कार्यालयाच्या हद्दीत २४.५० मेट्रिक टन, ग क्षेत्रीय कार्यालयाच्या हद्दीत ३२.१६ मेट्रिक टन तर ह क्षेत्रीय कार्यालयाच्या हद्दीत १६.४८ मेट्रिक टन असे एकूण २४९.५० मेट्रिक टन इतके निर्माल्य संकलित करण्यात आले असल्याची माहिती अतिरिक्त आयुक्त विजयकुमार खोराटे यांनी दिली आहे.














