- मावळमधील मराठा समाजाची मतं विभागणार? पक्षाला बसणार फटका?…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. २६ सप्टेंबर २०२४) :- महाराष्ट्रात मराठा आरक्षणाचे जोरदार वादळ घोंगावताना दिसत आहे. एकीकडे मराठा आरक्षणाचा मुद्दा तापतोय, तर दुसरीकडे विधानसभेचे वारे वाहू लागले आहेत. मावळ विधानसभेत तर राजकीय घडामोडींना प्रचंड वेग आला आहे. काही दिवसांपूर्वी मावळ भाजपाने विजयाचा संकल्प करणारा कार्यकर्ता मेळावा घेत विधानसभेचे रणशिंगे फुंकले. परंतु, याच मेळाव्यात मावळ भाजपाचे शिर्षस्थ नेते बाळा भेगडे यांनी केलेली दोन विधाने मात्र पक्षासाठी तापदायक ठरल्याचे दिसत आहे.
माजी राज्यमंत्री तथा भाजपाचे प्रदेश उपाध्यक्ष बाळा भेगडे यांनी २ ऑगस्ट रोजी झालेल्या कार्यकर्ता मेळाव्यामध्ये मराठा आरक्षणाचे नेते मनोज जरांगे पाटील यांच्या विरोधात एक वक्तव्य केले होते. ‘मावळच्या कार्यकर्त्यांच्या ताकदीवर मावळा म्हणून मी मनोज जरांगे यांना देखील सांगतो. आपण जर महाविकास आघाडीची सुपारी घेऊन या महाराष्ट्रातील मराठा समाजाची दिशाभूल करत असाल तर मराठा समाज तुमची मालकी नाही, हे लक्षात ठेवा’ असे वक्तव्य भेगडे यांनी केल होतं. त्यामुळे मराठा समाजातील पदाधिकारी, कार्यकर्ते दुखावले गेले आहेत.
महायुतीत ज्या पक्षाचा आमदार त्याच पक्षाला मतदारसंघ सोडायचा, असे प्राथमिक जागा वाटपाचे सुत्र ठरल्याची चर्चा आहे. त्यामुळे महायुतीत मावळची जागा अजित पवार गटाला मिळण्याची शक्यता आहे. त्यात विद्यमान आमदार सुनील शेळके यांनी पुन्हा निवडणूक लढविण्याचे जवळपास पक्के केले आहे. या सर्व परिस्थितीत बाळा भेगडे यांनी थेट बंडाची भूमिका घेतली आहे. वडगावमधील मेळाव्यात बोलताना बाळा भेगडे यांनी, मावळची जागा भाजपाला मिळाली नाही तर या ठिकाणी सांगलीची पुनरावृत्ती होईल, असा जाहीर इशारा देत बंडखोरीचे संकेत दिले आहेत.
पक्षाला फटका बसणार?
बाळा भेगडे यांनी दिलेले बंडखोरीचे संकेत आणि मनोज जरांगेंवरील टीका यामुळे मावळ भाजपा चर्चेच्या केंद्रस्थानी आला आहे. पक्षाला जागा न सुटल्यास स्थानिक नेत्यांनी विधानसभेत बंडखोरीचे संकेत दिले. स्थानिक नेत्यांची ही भुमिका पक्षातील वरिष्ठांना तितकी आवडली नाही. त्यांनी पदाधिकाऱ्यांचे कान टोचले आहेत. दुसरीकडे मनोज जरांगे यांच्यावरील टीकेमुळे मराठा समाजाचे पदाधिकारी भाजपावर कमालीचे नाराज झालेत. मावळात मराठा समाजाचा मतदार आहे. संघटनात्मक दृष्टीने तो एकवटलेला देखील आहे. त्यामुळे जरांगेंवरील टीकेचा फटका भाजपाला निवडणूकीत बसू शकतो, असे जाणकार सांगत आहेत.
मावळ विधानसभा हा एकेकाळी भाजपाचा बालेकिल्ला होता. मात्र २०१९ साली भाजपाने आपली ही जागा गमावली. बाळा भेगडेंना पराभूत करत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे सुनील शेळके येथे आमदार झाले. शेळके भाजपातून राष्ट्रवादीत येऊन आमदार झाल्याने तालुक्यात भाजपा मोठ्या प्रमाणात बॅकफूटवर गेला. राज्यात सध्या महायुतीचे सरकार असून भाजपा, राष्ट्रवादी सोबत आहेत. मात्र, मावळमधील भाजपा, राष्ट्रवादी यांच्या पदाधिकाऱ्यांना ही युती मान्य नसल्याचे दिसत आहे.












