- क्यूआर कोडचा वापर करण्याचे मालमत्ताधारकांना आवाहन…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. ०५ ऑक्टोबर २०२४) :- शहरातील सर्व प्रकारच्या मालमत्तांचे, कर आकारणी व कर संकलन विभागामार्फत मालमत्ता सर्वेक्षणाचे काम अंतिम टप्प्यात आले आहे. यामध्ये ८,५५,१०२ मालमत्तांना सलग अनुक्रमांक (जिओ सिक्वेन्सिंग) देण्यात आले असून ५,३२,३०७ मालमत्तांचे अंतर्गत मोजमाप करण्यात आले आहे. मालमत्ता सर्वेक्षणांतर्गत करण्यात आलेल्या मोजमाप प्रक्रियेमध्ये नव्याने निदर्शनास आलेल्या मालमत्तांपैकी ५२,७८७ मालमत्तांपर्यंत विशेष नोटिस १ चे वाटप करण्यात आले असून यामधील २२,५८२ मालमत्ताधारकांनी हरकती दाखल केल्या असून त्यापैकी १६,९५३ मालमत्ताधारकांनी आवश्यक कागदपत्रांची पूर्तता केली असून त्यांना अंतिम बिल मिळाले आहे. यामधील ४,२६१ मालमत्ताधारकांनी ८,९९५४,२८९ रुपये कराचा भरणा केला असून ४,१३४ मालमत्ताधारकांनी ऑनलाइन स्वरुपात कर भरुन त्यावरील सवलतींचा लाभ घेतला आहे.
आत्तापर्यंत विशेष नोटिस १ मिळालेल्या मालमत्ताधारकांपैकी २२,५८२ मालमत्ताधारकांनी हरकती दाखल केल्या असून यापैकी २०,४७५ मालमत्ताधारकांनी ऑफलाइन पद्धतीने, तर २,१०६ मालमत्ताधारकांनी ऑनलाइन स्वरूपात हरकती दाखल केल्या आहेत. नागरिकांनी मिळालेल्या नोटिसवरील ‘क्यूआर कोड’ स्कॅन करून ऑनलाइन पद्धतीनेच नोटिस मान्य करून आपले बिलसुद्धा प्राप्त करावे व त्यानंतर आपला मालमत्ताकराचा भरणाही ऑनलाइन स्वरूपात करण्यासाठी सोय उपलब्ध करून देण्यात आली आहे.
त्यासोबतच ज्या नागरिकांना मालमत्तेबाबत हरकत दाखल करावयाची असेल त्यांनी ऑनलाइनरीत्या हरकत दाखल केल्यानंतर त्यावर तत्काळ निपटारा आणि हरकतीवर सुनावणीसुद्धा ऑनलाइन स्वरूपात घेण्यासाठी प्राधान्य देण्यात येत आहे. नागरिकांनी हरकत दाखल करताना आवश्यक कागदपत्रांची पूर्तता केल्या नंतर हरकतीवर सुनावणीची प्रक्रिया करण्यात येणार आहे, असे आवाहन कर आकारणी व कर संकलन विभागाकडून करण्यात आले आहे.
विशेष नोटिस १ प्राप्त झाल्यानंतर हरकतींसाठी २१ दिवसांची मुदत…
ज्या मालमत्ताधारकांना विशेष नोटिस १ प्राप्त झाल्यानंतर नोटिस अमान्य असल्यास हरकत दाखल करण्यासाठी २१ दिवसांची मुदत देण्यात आली आहे. मालमत्ताधारकांनी आपल्या मालमत्तेबाबत, करयोग्य मूल्य मान्य नाही, आकारणी दिनांक मान्य नाही, करपात्र क्षेत्रफळ मान्य नाही, मालमत्तेवरील नावामध्ये
चूक, मालमत्तेवरील पत्ता चुकीचा, मोबाइल क्रमांक व ई-मेल आयडी चुकीचा इत्यादीबाबत हरकती दाखल करता येत आहेत. नागरिकांनी अशा हरकतींबाबत आवश्यक कागदपत्रांची ऑनलाइन पद्धतीनेच पूर्तता करून हरकतीवर सुनावणी करण्यात येणार आहे. त्यामुळे नागरिकांनी विशेष नोटिस प्राप्त झाल्यानंतर २१ दिवसांच्या आत वरील हरकती असतील तर त्या दाखल करणे आवश्यक असणार आहे, असे आवाहन करसंकलन विभागामार्फत करण्यात आले आहे.
ज्या मालमत्तांची चालू वर्षी नव्याने आकारणी झाली आहे, अशा मालमत्तांना बिल लागू झाल्यापासून तीन महिन्यांपर्यंत विविध सवलतींचा लाभ घेता येणार आहे. यामध्ये मालमत्ताधारकांनी आगाऊ कर भरल्यास ५ टक्के तर ऑनलाइन स्वरूपात कर भरल्यास ५ टक्के, महिलांच्या नावे असलेल्या एका निवासी घरास ३० टक्के, दिव्यांग व्यक्तींच्या नावे असलेल्या मालमत्तेस ५० टक्के, झिरो वेस्ट आणि ‘एसटीपी प्लॅंट’ कार्यान्वित असल्यास १० टक्के, इलेक्ट्रिक वाहनांसाठी चार्जिंग स्टेशन उभारल्यास २ टक्के, ग्रीन बिल्डिंग रेटिंगमध्ये ३ ते ५ रेटिंग असणाऱ्या मालमत्तांना ५ ते १० टक्क्यांच्या सवलतींचा लाभ घेता येणार आहे.
पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेच्या करसंकलन विभागामार्फत शहरात सर्वच मालमत्तेचे सर्वेक्षण सुरू आहे. सर्वेक्षणांर्गत नव्याने निदर्शनास आलेल्या माल मत्तांना विशेष नोटिस १ वाटप करण्यात येत आहे. ज्या मालमत्ताधारकांना आपल्या नोटिसवर हरकती नोंदवायच्या असतील, अशा मालमत्ताधारकांनी नोटिसवर दिलेल्या क्यूआर कोडद्वारे ऑनलाइन पद्धतीने प्रक्रिया पूर्ण करावी. नागरिकांच्या सोयीसाठी महापालिकेकडून ऑनलाइन पद्धतीने जलद गतीने निपटारा करण्यात येत असून त्याचा लाभ घ्यावा.
– शेखर सिंह, आयुक्त तथा प्रशासक, पिंपरी-चिंचवड – महानगरपालिका…












