- आम आदमी पक्षाचा सवाल?…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. ०५ ऑक्टोबर २०२४) :- गेल्या अनेक वर्षापासून महापालिकेच्या वायसीएम रुग्णालयात दंत उपचाराच्या पूर्ण सुविधा मिळत नाहीत. दंत रुग्णांची केवळ तपासणी केली जाते. पुढील आवश्यक असणाऱ्या उपचारासाठी रुग्णांना शहरातील खाजगी हॉस्पिटलमध्ये पाठविले जाते.
दातांच्या तपासणीसाठी X-Ray काढणारी, तसेच मोठी (OPG) X-Ray मशीनही येथे उपलब्ध नाही. अनेक रुग्ण हे दातांमध्ये सिमेंट भरण्यासाठी येतात. तसेच काहीजण Root Canal साठीही येतात. परंतु, हे महत्वाचे उपचारसुद्धा रुग्णालयात केले जात नाहीत. नविन दात बसविण्याची प्रक्रियाही केली जात नाहीत. मुख्य दंत-तज्ञ (HOD) डॉक्टरही येथे उपलब्ध नाहीत.
या रुग्णालयामध्ये दररोज कमीत कमी ५०-६० रुग्ण केवळ दंत उपचारसाठी येत असतात. परंतु अपुरी सुविधा, सक्षम यंत्रणा नसल्यामुळे त्या गरजू-गरीब रुग्णांना खाजगी हॉस्पिटलमध्ये पाठविले जात आहे. शहरातील खाजगी रुग्णालयात यावर उपचार होतात, परंतु, श्रीमंत महापालिकेच्या वायसीएम रुग्णालयात मात्र यावर उपचार का केले जात नाहीत, असा सवाल आम आदमी पक्षाचे पदाधिकारी यलाप्पा वालदोर यांनी उपस्थित केला आहे.
याबाबत त्यांनी अति. आयुक्त विजयकुमार खोराटे यांना निवेदन दिले आहे. खोराटे यांनी निवेदनाची दखल घेऊन आरोग्य विभागाच्या राजेंद्र वाबळे यांना फोनवरून समस्या मार्गी लावण्याची सूचना केल्याची माहिती वालदोर यांनी दिली आहे.












