न्यूज पीसीएमसी नेटवर्क
सुदुंबरे (दि. ०५ ऑक्टोबर २०२४) :- मावळ तालुक्यातील सुदुंबरे येथील श्री संत संताजी जगनाडे महाराज समाधी मंदिर तीर्थक्षेत्र विकास आराखड्याच्या भूमिपूजनप्रसंगी मावळ तालुक्याचे आमदार सुनील शेळके यांचा पारा चांगलाच तापला. विरोधकांवर तोंडसुख घेताना त्यांनी अगदी टोकाची टीका केली. मात्र, उपमुख्यमंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री, अजित पवार यांनी त्यांचा पारा शांत करण्याचा प्रयत्न केला. त्यामुळे त्याची सर्वत्रच कुजबुज सुरु होती.
सभेत बोलताना आ. सुनील शेळके म्हणाले, “तुम्ही तुमची इच्छा व्यक्त करत असताना मावळच्या मायबाप जनतेला दहशतीखाली आणू नका. मावळच्या मायबाप जनतेला दडपणाखाली आणण्याचा प्रयत्न तुम्ही कराल तर आज व्यासपीठावरून सांगतो, माझी मायबाप जनता प्रेमळ आहे. एखाद्याला जीव लावते आणि एखाद्याचा कार्यक्रम करते. कुणी दादागिरी करण्याचा प्रयत्न केला तर सुनील शेळके या मायबाप जनतेवरील अन्याय सहन करणार नाही. प्रत्येकजण मरायला आलेला आहे. जर तुम्हाला दहशत कारायची असेल आणि दादागिरी करायची असेल तर माझ्यावर करा. मात्र, मायबाप जनतेला आणि माझ्या सहकाऱ्यांवर दादागिरी करायची नाही”, असं आमदार सुनील शेळके यांनी भाषणात म्हंटल.
यानंतर बोलताना अजित पवार म्हणाले, “आज आमच्या सुनील शेळके यांची गाडी जरा गरम होती. पण जरा सबुरीनं घ्यायचं. आपल्याला सर्वांची गरज आहे. आपल्याला कोणालाही नाराज करायचं नाही. कारण त्यामधून फार काही साध्य होत नाही. पण एक गोष्ट खरी आहे की खूप काम केलं आणि कुठेतरी त्रास व्हायला लागला तर मनाला वेदना होतात”, असं उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी म्हटलं आहे.












