न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. ०६ ऑक्टोबर २०२४) :- मराठी भाषेला अभिजात दर्जा मिळाल्याबद्दल न्यू सिटी प्राईड इंग्लिश मीडियम स्कूल मध्ये आनंदोत्सव साजरा करण्यात आला. केंद्रीय मंत्रिमंडळाची काल (गुरुवारी) महत्त्वाची बैठक पार पडली. या बैठकीत मराठी भाषेला अभिजात दर्जा देण्याचा महत्वपूर्ण आणि ऐतिहासिक निर्णय घेण्यात आला. या ऐतिहासिक निर्णयाचे स्वागत करून आनंदोत्सव साजरा केला. यावेळी ‘मी मराठी, आम्ही मराठी’, माय मराठी. अशा घोषणा विद्यार्थ्यांनी दिल्या.
कार्यक्रमाच्या सुरुवातीला कवी कुसुमाग्रजांच्या व सरस्वतीच्या प्रतिमेचे पूजन संस्थेचे संस्थापक श्री अरुण चाबुकस्वार शाळेचे उपमुख्याध्यापक सचिन कळसाईत यांनी केले यावेळी शाळेतील शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते.
यावेळी बोलताना संस्थेचे संस्थापक अरुण चाबुकस्वार म्हणाले की, या ऐतिहासिक निर्णयाचे खरे श्रेय महाराष्ट्रातील संत परंपरेला आहे. ज्यांनी आपल्या ग्रंथ, पोथी, ओव्या आणि वाड्मयाद्वारे रचलेल्या “माझा मराठाचि बोलु कौतुके। परि अमृताते ही पैजा जिंके।” या शब्दांमधून मराठी भाषेविषयी असलेले प्रेम आणि अभिमान प्रत्येक मराठी जनांमध्ये रुजविला. त्यांच्या या योगदानामुळेच आज आम्हाला या ऐतिहासिक दिवसाचा साक्षीदार होता आले. हा निर्णय घेतल्याबद्दल केंद्र सरकारचे मनापासून आभार.
तसेच शाळेचे उपमुख्याध्यापक सचिन कळसाईत यांनीही त्यांचे मत मांडले की महाराष्ट्रासाठी आणि मराठी भाषाप्रेमींसाठी हा ऐतिहासिक सोनेरी दिवस आहे आपल्या माय मराठीला अभिजात भाषेचा दर्जा मिळालेला हा आजचा दिवस “लाभले आम्हास भाग्य; बोलतो मराठी” असं अभिमानाने म्हणणाऱ्या जगभरातील प्रत्येक मराठी भाषिकांसाठी ऐतिहासिक आणि सुवर्णाक्षरात लिहिला जावा असा दिवस आहे. हा निर्णय घेतल्याबद्दल तसेच गेल्या अनेक वर्षांपासून यासाठी संघर्ष करणाऱ्या आणि सातत्याने पाठपुरावा, प्रयत्न करणाऱ्याच्या लढ्याला यश मिळाले आहे.
महाराष्ट्राची मान उंचविणारा असा हा आजचा ऐतिहासिक दिवस आहे. या ऐतिहासिक दिवसांसाठी महाराष्ट्रातील अनेक थोर साहित्यिक, विचारवंत, अभ्यासक, समीक्षक यांनी कित्येक वर्षे संघर्ष केला. त्यामुळे यश मिळाले आहे. आणि हा सोनियाचा दिनू तमाम मराठी भाषिकांना पाहायला मिळाला आहे.
या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन भावना देवरे मॅडम यांनी केले आणि आभार प्रदर्शन प्रज्ञा शिरोडकर यांनी केले.