न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. ०७ ऑक्टोबर २०२४) :- पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या वतीने पंतप्रधान आवास योजनेअंतर्गत डुडुळगाव येथे गृहप्रकल्पाचे काम सुरू आहे. तेथील सदनिकांसाठी महिनाभरात केवळ २ हजार अर्ज आले आहेत. अर्ज स्वीकारण्यासाठी ३१ ऑक्टोबरपर्यंत एक महिन्याची मुदतवाढ देण्यात आली आहे.
त्या ठिकाणी ३२३ चौरस फूट चटई क्षेत्र आकाराच्या एकूण १ हजार १९० सदनिका आहेत. त्यासाठी १४ लाख १४ हजार १७३ रुपये हिस्सा पात्र लाभार्थ्यांना भरावा लागणार आहे. या सदनिकांसाठी १० हजार ५०० रुपये भरून ऑनलाईन अर्ज स्वीकारण्यास ३० ऑगस्टला सुरुवात झाली आहे. तीस सप्टेंबरपर्यंतच्या एका महिन्यात एकूण २ हजार अर्ज महापालिकेस प्राप्त झाले आहेत.
गृहप्रकल्पाच्या नोंदणीसाठी महापालिकेस प्राप्त झालेल्या अर्जाच्या तुलनेत ही संख्या खूपच कमी आहे. त्यामुळे महापालिकेने अर्ज स्वीकृतीस एका महिन्याची मुदतवाढ दिली आहे. अर्ज ३१ ऑक्टोबरपर्यंत स्वीकारण्यात येणार आहेत. आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकातील कुटुंबांनी अर्ज करावेत, असे आवाहन झोपडपट्टी निर्मुलन व पुनर्वसन विभागाचे उपायुक्त अण्णा बोदडे यांनी केले आहे.












