न्यूज पीसीएमसी नेटवर्क
भोसरी (दि. १० मे २०१९) :- शिरूर लोकसभा मतदारसंघातील भाजप- सेना युती आणि राष्ट्रवादी काँग्रेस आघाडीच्या उमेदवारांनी ७० लाखांपेक्षा अधिक खर्च करून आचारसंहितेचा भंग केला आहे. मर्यादेपेक्षा अधिक खर्च करणा-या उमेदवारांवर कारवाई करावी, अशी मागणी शिरूर लोकसभा मतदारसंघातील हमारी अपनी पार्टीचे उमेदवार शशिकांत देसाई यांनी निवेदनाद्वारे निवडणूक आयोगाकडे केली आहे.
शिरूर मतदारसंघात एकूण २२८८ पोलिंग बूथ आहेत. पोलिंग बूथ प्रतिनिधीसाठी भत्ता किमान एक हजार दिला तरी त्यासाठी किमान २२ लाख खर्च येतो. मतदारसंघात युती व आघाडीच्या उमेदवारासाठी राष्ट्रीय नेत्यांच्या सभा झाल्या. सरासरी एका सभेला २० लाख खर्च होतो, तर सहा सभांसाठी हा आकडा कोटींच्या घरात पोहचतो.
प्रचारासाठी पत्रके आणि इतर दैनंदिन खर्च काही कोटी आहे. हे निवडणूक कर्मचा-यांनाही माहीत असूनही, कारवाई केली जात नाही. निवडणूक आयोगाची दिशाभूल करून आणि खर्च ७० लाखांच्या आत दर्शविला जातो. अशा उमेदवारावर कारवाई करावी, असे या निवेदनात देसाई यांनी म्हटले आहे.











