न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. १० मे २०१९) :- दहा वर्षांच्या चिमुकलीसमोर हैवान झालेल्या बापाने आईचा वायरच्या साहाय्याने गळा आवळून खून केला. भेदरलेल्या मुलीने तिच्या मामाला डोळ्यादेखत घडलेला थरार सांगितला. ही धक्कादायक घटना बुधवारी (दि. ८) रात्री साडेबाराच्या सुमारास रहाटणीतील गंगानगरमध्ये घडली.
वंदना उत्तम जाधव (रा, गंगानगर, रहाटणी) असे खून झालेल्या महिलेचे नाव आहे. या प्रकरणी तिचा पती उत्तम जाधव याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणी पुंडलिक श्यामराव वाघमारे (३४, रा. पवनानगर) यांनी सांगवी पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
वरिष्ठ पोलिस निरीक्षक प्रभाकर शिंदे यांनी दिलेल्या माहितीनुसार आरोपी उत्तम याला दारूचे व्यसन आहे. तो दररोज दारूच्या नशेत पत्नी वंदना आणि मुले ओंकार, दीपाली यांना मारहाण करीत होता. दहा वर्षांची दीपाली दररोज उघड्या डोळ्याने आपल्या आईंचे हाल पाहात होती. मात्र, बापाच्या भीतीपोटी तिच्या तोंडून शब्द फुटत नव्हते.
उत्तम हा मुंबईला गेल्याची पोलिसांना माहीती मिळाली असून, सांगवी पोलिसांचे पथक त्याच्या शोधासाठी मुंबईस रवाना झाले आहे.











