न्यूज पीसीएमसी नेटवर्क
देहू वार्ताहर (दि. १७ ऑक्टोबर २०२४) :- देहू नगरपंचायतीच्या वतीने घरपट्टी व पाणीपट्टी वसुलीसाठी अनोखा फंडा अवलंबला आहे. देहू नगरपंचायतीने नागरिकांनी आपला कर लवकरात लवकर भरावा यासाठी गृहोपयोगी विविध वस्तू लकी ड्रॉ देण्यात येणार आहे. यासाठी कुपनदेखील वाटप करण्यात येत आहेत. शिवाय ही योजना ३०ऑक्टोबरपर्यंत सुरू असणार असून या पूर्वी कर भरणाऱ्या करदात्याला १ टक्का सवलतदेखील देण्यात येत आहे. ही योजना जाहीर केल्यानंतर दहा दिवसात सुमारे ७० लाख रुपये कर रुपाने संकलित झाले असल्याची माहिती कर संकलन अधिकारी ज्ञानेश्वर शिंदे यांनी दिली.
या योजनेद्वारे नागरिकांना १ जानेवारी २०२५ रोजी बक्षिसांचे वाटप करण्यात येणार असल्याचे नगरपालिकेच्या वतीने सांगण्यात आले आहे. तसेच या योजनेचा सर्व करदात्यांनी फायदा घ्यावा, असे आवाहन नगराध्यक्षा पूजा दिवटे यांनी केले आहे.
श्री क्षेत्र देहू नगरपंचायतीच्या हद्दीत घरपट्टी आणि पाणीपट्टीद्वारे मिळणारे उत्पन्नदेखील वाढत आहे. मात्र, ते वसूल करण्यामध्ये अडचणी येत होत्या. करवसुलीसाठी गेल्या वर्षापासून नगरपंचायतीच्या वतीने थकबाकीदारांच्या घरापुढे ढोल वाजविणे, चौकात यादी जाहीर करणे, नोटिसा बजावणे यासारख्या उपाययोजना केल्या होत्या. यंदा मात्र, १०० टक्के करवसुली व्हावी, यासाठी लकी ड्रॉ व एक टक्का सवलत जाहीर केली आहे.












