- राष्ट्रवादीच्या पदाचा राजीनामा देत अपक्ष निवडणूक लढविण्याची केली घोषणा…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
मावळ वार्ताहर (दि. २३ ऑक्टोबर २०२४) :- सुनील शेळके यांना पक्षाने उमेदवारी जाहीर केल्यानंतर नाराज झालेले बापूसाहेब भेगडे यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या प्रदेश उपाध्यक्ष पदाचा राजीनामा दिला आहे. तातडीने बोलाविलेल्या पत्रकार परिषदेत बापूसाहेब भेगडे यांनी आपण पक्षाच्या उपाध्यक्ष पदाचा राजीनामा देत असून तसा इमेल वरिष्ठांना करत असल्याचे सांगितले. यासह कार्यकर्त्यांच्या आग्रहाखातर आपण मावळ विधानसभेची निवडणूक अपक्ष लढविणार असल्याचेही भेगडे यांनी पत्रकार परिषदेत जाहीर केले.
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात मावळ मतदारसंघाची निवडणूक लढविण्यासाठी आमदार सुनील शेळके यांसह पक्षातील बापूसाहेब भेगडे हे देखील इच्छुक होते. त्यामुळे उमेदवारी मिळविण्यासाठी दोन्ही नेत्यांत चढाओढ सुरू होती. परंतु प्रारंभीपासूनच पक्षाच्या वरीष्ठ नेत्यांकडून सुनील शेळके यांना उमेदवारी मिळण्याची चिन्हे दिसत होती. त्यानुसार बुधवारी जेव्हा राष्ट्रवादीकडून विधानसभेची पहिली यादी जाहीर झाली, तेव्हा सुनील शेळके यांना मावळची उमेदवारी घोषित झाली.
यामुळे उमेदवारी न मिळालेले बापूसाहेब भेगडे आणि त्यांचे कार्यकर्ते नाराज झाले. यामुळे बापूसाहेब भेगडे यांनी तातडीने पत्रकार परिषद बोलाविली, त्यात त्यांनी तिकीट न मिळाल्याबद्दल नाराज असल्याचे सांगत आपण पक्षाच्या प्रदेश उपाध्यक्ष पदाचा राजीनामा देत असल्याचे सांगितले. यासह कार्यकर्त्यांच्या आग्रहाखातर आपण ही निवडणूक अपक्ष म्हणून लढविणार असल्याचेही सांगितले. यावेळी पत्रकार परिषदेला बबनराव भेगडे आणि इतर ज्येष्ठ पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.
राष्ट्रवादी पक्षाच्या स्थापनेपासून मी क्रियाशील सदस्य आहे. २०२४ च्या विधानसभेसाठी मी दादांकडे उमेदवारी मागितली होती, पण विद्यमान आमदारांना तिकीट दिले गेले आहे. २०१९ मध्ये एकदा संधी द्या हा दिलेला शब्द आता पाळला गेला नाही. मी निष्ठावंत कार्यकर्ता असून या प्रकाराचे मला दुःख झाले आहे. त्यामुळे मी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या उपाध्यक्ष पदाचा राजीनामा देत आहे. तसेच कार्यकर्त्यांच्या आग्रहाखातर २०२४ ची विधानसभा निवडणूक अपक्ष लढविणार आहे, असे बापूसाहेब भेगडे यांनी पत्रकार परिषदेत सांगितले.















