न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. २४ ऑक्टोबर २०२४) :- सुदुंबरे गावातील विठ्ठल मंदिरात कोजागरी पौर्णिमेच्या दुसऱ्या दिवशी म्हणजेच गुरुवारी (दि. १७) पासून काकड आरती सोहळ्याला सुरुवात झाली आहे. त्यामुळे पहाटेचे वातावरण टाळ मृदंगाचा निनाद व काकड आरतीचे सुस्वर अभंगांच्या गायनाने भक्तीमय होऊन गेले आहे.
विठ्ठल प्रासादिक भजनी मंडळाच्या वतीने या सोहळ्याचे आयोजन करण्यात आले आहे. हा सोहळा तब्बल महिनाभर चालणार आहे. पुढील महिन्यात रविवारी (दि. १७ नोव्हेंबर) रोजी काल्याच्या कीर्तनाने या सोहळ्याची समाप्ती होणार आहे.
गावातील ज्येष्ठ महिला व पुरुष तसेच भाविक युवक, युवती व बालगोपाळ हे भल्या पहाटे विठ्ठल मंदिरात येऊन या भक्ती सोहळ्याचा आनंद लुटतात. साधारणपणे पहाटे पाच वाजता एकेका भाविक कुटुंबाचे हस्ते ‘कार्तिक स्नान महापूजा आणि अभिषेक’ केला जातो. काकड आरतीचे अभंग गायन झाल्यानंतर त्याच कुटुंबाच्या हस्ते काकड आरती होते.