- राष्ट्रवादी व भाजप हे दोन्ही पक्ष मुस्लिम बांधवासाठी जातीयवादीच – कुतबुद्दीन होबळे…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
भोसरी (दि. १० नोव्हेंबर २०२४) :- पुण्यातील एका सभेत जाहिरपणे भाजपाचे काही नेते मुस्लिम समाजाच्या प्रार्थना स्थळाबाबत वक्तव्य करत असताना भोसरीतील आमदार होऊ पाहणारे काही नेते मंडळी तेव्हा शांत का होते, कारण राष्ट्रवादी असेल किंवा भाजपा हे दोन्ही पक्ष एकाच नाण्याच्या दोन बाजू असून हे दोन्ही पक्ष मुस्लिम समाजाच्या दृष्टीने जातीयवादीच असल्यामुळे मुस्लिम बांधव या दोन्ही पक्षापासून व दोन्ही उमेदवारापासून दुरच राहून मलाच सहकार्य करतील, असा विश्वास भोसरी विधानसभेतील अपक्ष उमेदवार कुतबुद्दीन होबळे यांनी निगडी येथील एका प्रचार दरम्यान व्यक्त केला.
लब्बैक फाऊंडेशन महाराष्ट्रच्या वतीने राष्ट्रवादीचे उमेदवार अजित गव्हाणे यांना दिलेल्या पाठींब्याच्या भुमिकेवरून पत्रकारांनी भोसरी विधानसभेचे उमेदवार कुतूबुद्दीन होबळे यांना याबाबत विचारले असता होबळे यांनी वरील प्रतिक्रीया देऊन सांगितले, की कॉग्रेस व राष्ट्रवादी पक्षाच्या विचारधारेनेच मुस्लिम समाजाच्या प्रगतीवर घाला घातला असून राज्यात व देशातील मुस्लिम समाजातील युवकांना प्रगतीच्या प्रवाहात सामिल होण्यापासून परावृत्त करुन विकासापासून वंचित ठेवले आहे. त्यामुळे मुस्लिम समाजासाठी ज्या प्रमाणात भाजापाचे स्थान आहे, त्या प्रमाणेच राष्ट्रवादी पक्षाचे सुध्दा आहे. त्यामुळे मुस्लिम बांधव व मतदार सततच कॉग्रेस विचारधारेवर विश्वास टाकून स्वताची फसवणुक करणार नाही.
याचे उत्तर मुस्लिम समजाला द्या..
भाजपावाले मुस्लिम समाजाच्या बाबतीत उघड भुमिका घेत असतात तर राष्ट्रवादी वाले आतुन मुस्लिम समाजाच्या विरोधात षडयंत्र रचत असतात, हे आमच्या पासून लपून राहिले नाही. त्यामुळेच पुण्यामध्ये जेव्हा काही राजकीय नेते प्रार्थना स्थळाबाबत आक्षेपार्ह वक्तव्य करत असताना भोसरीतील ही शरद पवार गटाच्या राष्ट्रवादीची नेतेमंडळी किंवा उमेदवार अजित गव्हाणे त्यावेळस काय करत होते. यांना आमच्या समाजाची मते चालतात पण समाजाच्या समस्या, अस्मिता आणि प्रार्थना स्थळांचा अपमान होत असताना ते शांत का होते? याचे उत्तर अगोदर आमच्या समाजबांधवाना द्यावे व नंतरच समाजाने देखील त्यांना पांठीबा द्यावा की नाही याचा निर्णय घ्यावा, असे आवाहन कुतबुद्दीन होबळे यांनी मुस्लिम बांधवांना केले आहे.

















