- उच्चशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांची घोषणा…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
देहूगाव (दि. २४ जानेवारी २०२६) :- श्रीक्षेत्र भंडारा डोंगरावर अखिल वारकरी संप्रदाय व महाराष्ट्राला भूषण वाटावे, असे जगद्गुरू श्री संत तुकाराम महाराजांचे भव्य-दिव्य मंदिर उभे राहत असून या मंदिराच्या अंतिम कामाच्या टप्प्यावर एकूण ९ दरवाजे व ७ खिडक्यांसाठी होणारा एकूण अंदाजे रुपये २ कोटींची देणगी मी व्यक्तिश: पुढाकार घेऊन लवकरात लवकर ट्रस्ट कडे सुपूर्त करेल, अशी घोषणा महाराष्ट्र राज्याचे उच्च शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी श्री क्षेत्र भंडारा डोंगर येथे केली.
संत ज्ञानेश्वर महाराज सप्तशतकोत्तर सुवर्ण महोत्सवी जयंती, संत तुकाराम महाराज त्रिशतकोत्तर अमृत महोत्सवी सदेह वैकुंठ गमन सोहळा, संत नामदेव महाराज व संत जनाबाई षष्ठशतकोत्तर अमृत महोत्सवी संजीवन समाधी सोहळा, संत सावता माळी ६३० वी जयंती व तपोनिघी नारायण महाराज त्रिशतकोत्तर प्रकाट्या वर्षानिमित्ताने वारकरी रत्न छोटे माऊली महाराज कदम यांच्या नेतृत्वात श्रीक्षेत्र भंडार डोंगर ट्रस्टने आयोजित केलेल्या अखंड ज्ञानेश्वरी व गाथा पारायण, कीर्तन महोत्सव सोहळ्याला राज्याचे उच्च शिक्षण मंत्री चंद्रकात पाटील यांनी भेट दिली.
तुकोबारायांचे दर्शन घेऊन चंद्रकांत पाटील यांनी मंदिराच्या कामाची पाहणी केली. मी व्यक्तिश: वारकरी संप्रदायाचा पाईक असून या मंदिर निर्माणाच्या कार्यासाठी माझी सदैव सहकार्याची भूमिका राहील अशी ग्वाही चंद्रकांत पाटील यांनी याप्रसंगी दिली.
श्रीक्षेत्र भंडारा डोंगर ट्रस्टच्यावतीने अध्यक्ष बाळासाहेब काशिद यांच्या शुभहस्ते तुकोबारायांच्या मंदिराची प्रतिमा देऊन चंद्रकांत पाटील यांचा सन्मान करण्यात आला. याप्रसंगी भोसरीचे माजी आमदार विलास लांडे, विजय जगताप, छोटे माऊली महाराज कदम, गणेश कळमकर आदी उपस्थित होते.
















