- एकात्मिक सीसीटीव्ही प्रकल्पाला शासनाची मंजुरी
सुरज करांडे, क्राईम प्रतिनिधी…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी चिंचवड (दि. २५ जानेवारी २०२६) :- महाराष्ट्र शासनाच्या गृह विभागातील अतिरिक्त मुख्य सचिव यांच्या अध्यक्षतेखालील उच्चस्तरीय समितीने (HPC) पिंपरी-चिंचवड पोलिस आयुक्तालयासाठी एकात्मिक सीसीटीव्ही प्रकल्पास मान्यता दिली आहे. गुन्हे नियंत्रण, वाहतूक व्यवस्थापन, गर्दी नियंत्रण आणि सार्वजनिक सुरक्षेसाठी हा अत्याधुनिक एआय-आधारित प्रकल्प महत्त्वाचा ठरणार आहे.
या प्रकल्पांतर्गत पिंपरी-चिंचवड स्मार्ट सिटी व महानगरपालिकेच्या विद्यमान सीसीटीव्ही कॅमेऱ्यांचे एकत्रीकरण करण्यात येणार असून, कव्हरेज नसलेल्या भागांत नवीन कॅमेरे बसवले जाणार आहेत. चाकण, तळेगाव व भोसरी एमआयडीसी तसेच हिंजवडी आयटी हबमध्ये विशेष निगराणी ठेवण्यात येणार आहे. देहू व आळंदी येथे सण-उत्सव आणि पालखी काळात गर्दी व वाहतूक नियंत्रणासाठी सीसीटीव्ही जाळे उपयुक्त ठरणार आहे.
नव्या पोलिस आयुक्तालयात अत्याधुनिक कमांड अँड कंट्रोल सेंटर उभारण्यात येणार असून, थेट दृश्ये परिमंडळ, वाहतूक विभाग व पोलिस ठाण्यांना उपलब्ध राहणार आहेत. पोलिस आयुक्त विनय कुमार चौबे यांच्या नेतृत्वाखाली हा प्रकल्प सुरक्षित व स्मार्ट पिंपरी-चिंचवडसाठी महत्त्वाचा टप्पा ठरणार आहे.
















