- महानगरपालिका आयुक्तांना तातडीने कारवाई करण्याची सूचना…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी-चिंचवड (दि. २४ जानेवारी २०२६) :- पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेची सार्वत्रिक निवडणूक नुकतीच पार पडली असून, निवडणुकीनंतर शहराच्या विविध भागांमध्ये मोठ्या प्रमाणात बॅनर, पोस्टर व फ्लेक्स लावण्यात आले आहेत. या अनधिकृत जाहिरातींमुळे शहराचे सौंदर्य बाधित होत असून पिंपरी-चिंचवड शहर विद्रूप होत असल्याबद्दल विधानपरिषद आमदार अमित गोरखे यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली आहे.
या पार्श्वभूमीवर आमदार अमित गोरखे यांनी पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेचे आयुक्त यांना अधिकृत पत्र पाठवून तातडीने कारवाई करण्याची मागणी केली आहे. पत्रात आमदार गोरखे यांनी स्पष्ट नमूद केले आहे की, ‘निवडणूक निकालानंतर अनेक विजयी उमेदवार, विविध पक्षांचे उमेदवार तसेच कार्यकर्त्यांनी आपल्या विजयाच्या आनंदात शहरातील प्रमुख चौक, रस्ते, उड्डाणपूल, सिग्नल परिसर, सार्वजनिक ठिकाणी मोठ्या प्रमाणात बॅनर, पोस्टर व फ्लेक्स लावले आहेत. यामुळे शहराच्या सौंदर्यावर विपरीत परिणाम होत असून नागरिकांमध्ये अस्वस्थतेचे वातावरण निर्माण झाले आहे.
“स्वच्छ, सुंदर व शिस्तबद्ध शहर ही पिंपरी-चिंचवडची ओळख आहे. मात्र अनधिकृत बॅनर आणि पोस्टरमुळे ही ओळख धोक्यात येत आहे. काही ठिकाणी वाहतुकीस अडथळे निर्माण होत असून नागरिकांच्या सुरक्षिततेचा प्रश्नही उपस्थित होत आहे,” असे आमदार गोरखे यांनी पत्रात नमूद केले आहे. तसेच शहरातील सार्वजनिक मालमत्तेचे विद्रूपीकरण होणे, पर्यावरणाचा ऱ्हास होणे आणि कायदा-सुव्यवस्थेवर परिणाम होणे हे गंभीर मुद्दे असून महानगरपालिकेने याकडे गांभीर्याने पाहणे आवश्यक असल्याचे त्यांनी स्पष्ट केले आहे.
यामुळे महानगरपालिकेच्या संबंधित विभागांनी तातडीने विशेष मोहीम राबवून शहरातील सर्व अनधिकृत बॅनर, पोस्टर व फ्लेक्स काढून घ्यावेत, तसेच भविष्यात अशा प्रकारांना आळा घालण्यासाठी कठोर कारवाई करण्यात यावी, अशी ठाम मागणी आमदार अमित गोरखे यांनी केली आहे. शहर स्वच्छ, सुंदर आणि नियोजनबद्ध ठेवणे ही प्रशासनासोबतच लोकप्रतिनिधींचीही जबाबदारी असून, नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर कोणतीही तडजोड न करता कारवाई व्हावी, अशी भूमिका आमदार गोरखे यांनी मांडली आहे. या माध्यमातून आमदार अमित गोरखे यांनी स्पष्ट संदेश दिला असून, पिंपरी-चिंचवड शहराच्या सौंदर्य, शिस्त आणि सुव्यवस्थेशी कोणतीही तडजोड केली जाणार नाही, असेही त्यांनी ठामपणे सांगितले आहे.
















