- दोन पोलिस अधिकाऱ्यांना दुसऱ्यांदा राष्ट्रपती पदकाचा मिळाला मान…
सुरज करांडे, क्राईम प्रतिनिधी..
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी चिंचवड (दि. २५ जानेवारी २०२६) :- प्रजासत्ताक दिनाच्या पूर्वसंध्येला पिंपरी-चिंचवड पोलिस दलासाठी अभिमानास्पद बातमी समोर आली आहे. पोलिस दलातील दोन अधिकाऱ्यांना दुसऱ्यांदा राष्ट्रपती पदक जाहीर झाले असून, यामुळे आयुक्तालयाच्या शिरपेचात मानाचा तुरा खोवला गेला आहे.
सहायक पोलिस आयुक्त विठ्ठल कुबडे यांना पोलिस दलातील उत्कृष्ट व दीर्घकालीन सेवेबद्दल राष्ट्रपतींचे पदक जाहीर झाले आहे. नक्षलग्रस्त भागात तसेच पिंपरी-चिंचवडमध्ये त्यांनी गुन्हे नियंत्रण, तडीपार व प्रतिबंधात्मक कारवायांद्वारे प्रभावी कामगिरी केली आहे.
तर पोलिस निरीक्षक अमोल फडतरे यांना पुन्हा एकदा राष्ट्रपतींचे ‘पोलिस शौर्य पदक’ जाहीर झाले आहे. गडचिरोलीतील अतिदुर्गम नक्षलग्रस्त भागात ‘सी-६०’ कमांडो पथकाचे नेतृत्व करत त्यांनी धाडसी व निर्णायक कारवाया केल्या होत्या.
या दोन्ही अधिकाऱ्यांच्या सन्मानामुळे पिंपरी-चिंचवड पोलिस दलाचा गौरव अधिकच वाढला असून, सर्व स्तरांतून त्यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.















