- नावासाठी नाही तर, उद्धारासाठी दान करा..
- विदर्भरत्न, रामायणाचार्य हभप संजय महाराज पाचपौर…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
देहूगाव प्रतिनिधी (दि. २५ जानेवारी २०२६) :- आपल्या सर्वांच्याच मागच्या पिढीने जगदगुरु तुकाराम महाराजांची कर्जे बुडविली असून आता आपण सर्वांनी याची परतफेड म्हणून या मंदिराच्या अंतिम टप्प्यात सुरु असणाऱ्या कळसाच्या कामासाठी लाखो रुपयांची देणगी या मंदिर निर्माणाच्या कार्याला देऊन उतराई होण्याची नामी संधी आता आली आहे. नावासाठी नाही तर आपल्या स्वतःचा व आपल्या कुटुंबाच्या उद्धारासाठी सढळ हाताने दान करा, असे प्रतिपादन विदर्भरत्न, रामायणाचार्य हभप संजयमहाराज पाचपौर यांनी केले.
माघ शुद्ध दशमीच्या निमित्ताने तुकोबारायांचा जन्मदिन वसंतपंचमी शुक्रवार, दि.२३ जानेवारी ते त्रयोदशी शनिवार, दि.३१ जानेवारी २०२६ या कालावधीत वारकरीरत्न छोटे माऊली महाराज कदम यांच्या नेतृत्वात श्रीक्षेत्र भंडारा डोंगर पायथ्याला श्रीक्षेत्र भंडारा डोंगर ट्रस्टने आयोजित केलेल्या अखंड हरीनाम सप्ताह, ज्ञानेश्वरी,गाथा पारायण व कीर्तन महोत्सवाच्या निमित्ताने रामायणाचार्य हभप संजयमहाराज पाचपौर बोलत होते.
अयोध्यातील प्रभू श्रीरामांच्या मंदिराप्रमाणेच जगद्गुरू तुकोबारायांचे मंदिर निर्माण व्हावे अशीच आपणा सर्वांची भावना होती. त्यानुसारच आज तुकोबारायांचे हे वैभव संपन्न मंदिर उभे राहत आहे. मी स्वतः या मंदिराच्या पायापासून तुम्हा सर्वांच्या सोबत आहे. हा संपूर्ण मावळचा परिसर श्रीमंत लोकांचा असून तुकोबारायांचे देखील श्रीमंत स्वरुपात मंदिर उभे राहत आहे याचा अखिल वारकरी संप्रदायाला आनंद आहे. तुकोबारायांचे हे मंदिर फक्त महाराष्टाचे नाही तर संपूर्ण देशाचे आहे. संत तुकाराम महाराजांनी याच भागातील लोकांची सुमारे ४ लाखाची कर्जे माफ केली होती. आजच्या काळात जवळ-जवळ ४०० कोटी एवढी ही रक्कम होईल. महाराजांकडून कर्जे घेणारी मंडळी ही याच भागातील होती, आमच्या विदर्भातील नव्हती. त्यामुळे तुकोबारायांच्या कर्जातून उतराई होण्यासाठी ही नामी संधी साक्षात तुकोबारायांनीच तुम्हाला आता दिली असून या मंदिर निर्माणाच्या अंतिम टप्प्यातील कार्यासाठी लाखो रुपयांची देणगी या भागातील दानशूर मंडळीनी द्यावी. नावासाठी नाही तर उद्धारासाठी दान करा असे, आवाहन पाचपौर महाराजांनी या निमित्ताने केले.
देव ते संत देव ते संत । निमित्य त्या प्रतिमा ॥ मी तों सांगतसें भावें । असो ठावें सकळां ॥
निराकारी ओस दिशा । येथ इच्छा पुरवसे ॥ तुका म्हणे रोकडें केणें । सेवितां येणें पोट धाय ॥
या जगद्गुरू तुकोबारायांच्या अभंगावर आपल्या कीर्तन सेवेतून निरुपण करीत पाचपौर महाराजांनी देव आणि संत यामध्ये कोणताही भेद नसून संत हे साक्षात ईश्वाराचे रूपच आहेत हे अनेक दृष्टांतांचा दाखला देत उपस्थित भाविकांना अगदी सहज सोप्या पद्धतीने पटवून सांगितले. या कीर्तन प्रसंगी पुणे जिल्हयातील अनेक मान्यवरांसह हजारो भाविक उपस्थित होते. या सोहळ्यासाठी देणगी देणाऱ्या अनेक मान्यवर दानशूर व्यक्तींचा हभप छोटे माऊली महाराज कदम व श्रीक्षेत्र भंडारा डोंगर ट्रस्टच्या वतीने सत्कार करण्यात आला.
काकडा आरती, श्री विठ्ठल-रूक्मिणी, संत तुकाराम महाराजांना अभिषेक करून सकाळी एका मंडपात ज्ञानेश्वरी व दुसऱ्या मंडपात गाथा पारायण झाले. दुपारच्या सत्रात खेड तालुका वारकरी संप्रदायाच्या वतीने हभप पिंगळे महाराज यांची कीर्तन सेवा संपन्न झाली. सायंकाळी ४ ते ६ या कालावधी मध्ये वारकरीरत्न हभप छोटे माऊली महाराज कदम यांच्या सुमधुर, रसाळ वाणीतून विश्वमाऊली संत ज्ञानेश्वर महाराज यांच्या जीवन चरित्रावरील कथा झाली. दुपारचे व रात्रीचे भोजन यासाठी पुणे जिल्हयातील ७ तालुक्यातील गावांना नियोजन करून दिल्याप्रमाने या महाअन्नदानाच्या कार्यासाठी अनेक गावांतून भाकरी येत असून दररोज हजारो भाविक या महाप्रसादाचा लाभ घेत आहेत.
















