न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. १२ नोव्हेंबर २०२४) :- : पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरणामार्फत पेठ क्रमांक १२ आणि पेठ क्रमांक ३०-३२ येथील शिल्लक असलेल्या सदनिकांसाठी ऑनलाइन अर्ज मागविण्यात येत आहेत. नागरिकांना यासाठी आवश्यक कागदपत्रे मिळण्यास वेळ लागत असल्याची स्थिती आहे. त्यामुळे पुणे महानगर आयुक्त डॉ. योगेश म्हसे यांनी नागरिकांच्या विनंतीनुसार ३० नोव्हेंबरपर्यंत अर्ज भरण्यास मुदतवाढ दिली आहे.
पीएमआरडीएने सर्वसामान्यांना परवडणाऱ्या घरांचा प्रकल्प साकारला आहे. या गृह प्रकल्पांतर्गत पेठ क्रमांक १२ येथील प्रधानमंत्री आवास योजना अंतर्गत ईडब्ल्यूएस प्रवर्गातील ४७ व एलआयजी प्रवर्गातील ६१४ सदनिका आणि पेठ क्रमांक ३०-३२ येथील ईडब्ल्यूएस (१) आरके) प्रवर्गातील ३४७ सदनिका व एलआयजी (१ बीएचके) प्रवर्गातील ३२१ सदनिका अशा एकूण १३३७ शिल्लक सदनिकांसाठी इच्छुकांकडून १२ नोव्हेंबरपर्यंत अर्ज मागविण्याची मुदत संपुष्टात येणार होती. परंतु ऑनलाइन अर्ज नोंदणीसाठी जी कागदपत्रे अपलोड करणे आवश्यक आहे. ती मिळण्यास नागरिकांना अधिकचा वेळ लागत आहे. त्यामुळे अनेकांनी अर्ज करण्यास मुदतवाढ द्यावी, अशी विनंती पीएमआरडीएकडे केली होती. याची महानगर आयुक्त डॉ. योगेश म्हसे यांनी दखल घेत सदनिकेसाठी अर्ज करण्यास ३० नोव्हेंबरपर्यंत मुदतवाढ दिली. नागरिकांनी तसेच अर्जदारांनी पीएमआरडीएच्या ०७३१६९०५७४५ या हेल्पलाइन क्रमांकावरून अधिक माहिती घेता येणार आहे. तसेच https://housing.pmrda.gov.in या संकेतस्थळावरून अर्ज करता येणार आहे.
सुधारित वेळापत्रकानुसार इच्छुकांना आता सदनिकेसाठी ३० नोव्हेंबरपर्यंत अर्ज अर्ज करता येईल. यानंतर १७ डिसेंबरला सोडतीसाठी अर्जाची स्वीकृत प्रारूप यादी प्रसिद्ध करत त्यावर १८ डिसेंबरपर्यंत आक्षेप नोंदवता येतील, यानंतर २७ डिसेंबरला सोडतीसाठी स्वीकृत अर्जाची अंतिम यादी प्रसिद्ध करत ३० डिसेंबरला ड्राय रननंतर ३१ डिसेंबरला अंतिम सोडत काढल्यानंतर पीएमआरडीच्या संकेतस्थळावर सोडतीमधील यशस्वी व प्रतीक्षा यादीवरील अर्जदारांची नावे प्रसिद्ध करण्यात येणार आहेत.

















