- आजपर्यंत २ हजार ३१८ नागरिकांनी घेतला सेवेचा लाभ…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. १९ नोव्हेंबर २०२४) :- पिंपरी, भोसरी आणि चिंचवड विधानसभा मतदारसंघातील नागरिकांना त्यांच्या मतदान केंद्राबाबतची माहिती देण्यासाठी महापलिकेच्या वतीने “नो यूवर पोलिंग स्टेशन” ही सेवा सुरु केली असून आजपर्यंत २ हजार ३१८ नागरिकांनी या सेवेचा लाभ घेतला आहे. मतदान केंद्र, बदललेले मतदान केंद्र, नावातील बदल यासाठी मतदारांनी महापालिकेच्या सारथी हेल्पलाईन क्रमांक ८८८८००६६६६ किंवा ०२०-६७३३९९९९ यावर संपर्क साधावा, असे आवाहन आयुक्त तथा प्रशासक शेखर सिंह यांनी केले आहे.
सार्वत्रिक विधानसभा निवडणूक २०२४ च्या अनुषंगाने पिंपरी चिंचवड शहरातील मतदानाची टक्केवारी वाढविण्याच्या दृष्टीकोनातुन विविध उपाययोजना करण्याबाबत निर्देश महापालिकेला दिले आहेत. त्यानुषंगाने आयुक्त शेखर सिंह आणि अतिरिक्त आयुक्त तथा स्वीप नोडल विजयकुमार खोराटे यांच्या मार्गदर्शनाखाली उप आयुक्त अण्णा बोदडे, सहाय्यक आयुक्त अविनाश शिंदे यांच्या नियंत्रणाखाली मतदार जनजागृती अभियान राबविण्यात येत आहे.
बुधवार दि.२० नोव्हेंबर २०२४ रोजी मतदान प्रक्रिया पार पडणार असून मतदानाच्या दिवशी महापालिकेच्या वतीने शहरातील सर्व मतदान केंद्रांवर विविध सोयीसुविधा उपलब्ध करून देण्यात आल्या असून नागरिकांना त्यांच्या मतदान केंद्राची माहिती देण्यासाठी सर्व क्षेत्रीय कार्यालयात “नो यूवर पोलिंग स्टेशन” कक्ष स्थापन करण्यात आले आहे. नागरिकांनी या कक्षास प्रत्यक्ष भेट देऊन अथवा सारथी हेल्पलाईनवर संपर्क साधून आपल्या मतदान केंद्राची माहिती घ्यावी, असे आवाहन आयुक्त सिंह यांनी केल आहे
मतदारांना आवाहन :-
१) मतदार यादीत नांव शोधण्यासाठी मतदारांकडे निवडणूक ओळखपत्रावरील इपिक नंबर EPIC NO (Electors Photo Indentification Card) समक्ष अथवा दुरध्वनी वरुन सांगितल्यास संबंधीत कर्मचा-यांना मतदार यादीत संबंधीत मतदाराचे मतदान कोणत्या मतदान केंद्रावर आहे हे शोधणे सुलभ जाईल. त्यासाठी मतदारांनी त्यांचा निवडणूक ओळखपत्रावरील इपिक नंबर सांगुन आपले मतदान कोणत्या मतदान केंद्रावर होणार आहे हे समजून घ्यावे.
२) निवडणूकीचे ओळखपत्र अथवा निवडणूकीचे ओळखपत्रावरील इपिक नंबर प्रयत्न करुनही उपलब्ध होत नसल्यास तुम्हाला संबंधीत कर्मचा-याला तुमचे नांव, वय, जन्मतारीख, जिल्हा आणि विधानसभा मतदारसंघाची माहिती देऊन तुमचे मतदान कोणत्या मतदान केंद्रात आहे हे शोधता येईल. तुमच्यासह तुमच्या कुंटुंबातील इतरांची नांवे शोधता येऊ शकतात.
३) जर मतदाराच्या मोबाईल क्रमांकाची नोंदणी निवडणूक आयोगाच्या डेटा मध्ये झाली असल्यास मतदाराला आपले नाव मोबाईलवर ओटीपी द्वारे शोधणे सहज शक्य होणार आहे.
पिंपरी चिंचवड महानगरपालिका कार्यक्षेत्रातील सर्व मतदारांनी वरील गोष्टीचा वापर केल्यास त्यांचे नांव कोणत्या मतदान केंद्रामध्ये आहे हे शोधण्यासाठी मदत होणार आहे. मतदार ओळखपत्रावरील नंबर वरुन त्यांचे नांव कोणत्या मतदार केंद्रामध्ये आहे हे शोधणे अधिक सुलभ, सोपे आहे. यासाठी सर्व मतदारांनी पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या आठही क्षेत्रीय कार्यालयांतर्गत नियुक्त करण्यात आलेल्या कर्मचा-यांना मनपाच्या सारथी हेल्पलाईन क्रमांक ८८८८००६६६६, ०२०-६७३३९९९९ यावर संपर्क साधुन अथवा समक्ष जाऊन प्रामुख्याने निवडणूकीचे ओळखपत्रावरील इपिक नंबरचा वापर केल्यास त्यांचे नांव कोणत्या मतदान केंद्रामध्ये आहे हे सहजरित्या कळणार असल्याचे आयुक्त तथा प्रशासक शेखर सिंह यांनी सांगितले. शहरातील सर्व नागरिकांनी आपला मताचा अधिकार बजावावा असे वाहन देखील त्यांनी यावेली केले आहे.

















