- निवडणूक विभागाच्या मोबाईल बंदीच्या निर्णयामुळे मतदारांची पंचाईत..
- मतदानाच्या टक्केवारीवर होऊ शकतो परिणाम?..
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. १९ नोव्हेंबर २०२४) :- लोकसभा निवडणुकीत मतदान केंद्रावर मोबाइल घेऊन जाण्यास बंदी घालण्यात आली होती. ऐनवेळी मोबाइल बंदीचा निर्णय घेतल्याने मतदारांची पंचाईत झाल होती. त्यामुळे घरातून मतदारांना मोबाईल घेऊन आल्यानंतर मोबाइल ठेवायचा कुठे?, असा प्रश्न अनेकांना पडला होता. त्यामुळे मतदानाची टक्केवारी घसरली होती. मात्र, निवडणूक विभागाने विधानसभेलाही मतदान केंद्रात मोबाइल घेऊन जाण्यास बंदी घातली आहे. गोपनीयतेचा भंग होऊ नये, याकरिता जिल्हा प्रशासनाने निर्णय घेतल्याचे सांगण्यात येत आहे.
लोकसभा निवडणुकीत मतदारसंघातील केंद्रांच्या शंभर मीटरच्या आत मोबाइल नेण्यास बंदी घातली होती. निवडणूक विभागाने मतदानाच्या दोन-तीन दिवस अगोदर अचानक घेतलेल्या या निर्णयाने मतदारांनी नाराजी व्यक्त केली होती. त्यामुळे पोलिसांबरोबर मतदारांचे वाद झाले होते.
काही नागरिक एकटेच मतदान केंद्रावर आले होते. त्यांना मोबाइल नेण्यास पोलिसांनी मज्जाव केल्याने त्यांनी पोलिसांशी काही वेळ वाद घालून सोडण्याची विनंती केली. पण पोलिस ऐकत नसल्याने मतदान करायचे नाही म्हणून ते परत माघारी निघून गेल्याचे दिसून आले. त्यामुळे लोकसभेप्रमाणे विधानसभा निवडणुकीतही मतदान केंद्रावर मोबाइल घेऊन जाण्यास बंदी घातल्याने त्याचा मतदानावर परिणाम होणार का, हे पाहावे लागणार आहे.
अनेक मतदारांना व्होटर स्लीपही मिळाली नव्हती. अनेकदा पिंपरी आणि चिंचवड मतदारसंघात राजकीय पक्षांकडून मतदारांना व्होटर स्लीप दिली जाते. पण काही मतदारांनी निवडणूक आयोगाच्या संकेतस्थळावरून व्होटर स्लीप डाऊनलोड करून घेतली. ही व्होटर स्लीप मोबाइलमध्येच सॉफ्ट कॉपी म्हणून ठेवली. परंतु, मतदान केंद्रावर मोबाइल नेण्यास बंदी असल्याने त्यांची व्होटर स्लीपची सॉफ्ट कॉपीही मोबाइलमध्ये राहिली. ऐनवेळी मतदारांना त्या व्होटर स्लीपमधील क्रमांक हातावर लिहून घ्यावा लागला. त्याशिवाय मोबाइलही बाहेर कोणाकडे ठेवण्याची वेळ आली.
मोबाईल ठेवायचा कुठे?
मोबाइल असलेल्या मतदारांना पोलिस मतदान केंद्रामध्ये सोडत नव्हते. त्यामुळे पती-पत्नी यांच्यातील एकाला मोबाइल घेऊन केंद्राबाहेर बसण्याची वेळ आली होती.

















