आता जिल्हाधिकाऱ्यांकडून नव्या मुदतीचा अल्टीमेटम..
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. २ डिसेंबर २०२४ ) :- रिंगरोडसाठी पूर्व भागातील २९ तसेच पश्चिम भागातील सात अशा ३६ गावांमधील काही जागांचे मोबदल्याचे निवाडे अद्याप शिल्लक आहेत. त्यामुळे हे निवाडे व शिल्लक राहिलेले भूसंपादन येत्या ३१ डिसेंबरपर्यंत पूर्ण करा, असे आदेश जिल्हाधिकारी डॉ. सुहास दिवसे यांनी संबंधित भूसंपादन अधिकाऱ्यांना दिले आहेत. रिंगरोडसाठीच्या आढावा बैठकीत त्यांनी हे आदेश दिले. यावेळी संबंधित उपविभागीय अधिकारी व भूसंपादन अधिकारी उपस्थित होते.
रिंगरोडच्या पूर्व भागाचे ८० टक्के तर पश्चिम भागात ९८ टक्के जमिनीचे संपादन पूर्ण झाले आहे, अशी माहिती बैठकीत देण्यात आली. त्यात काही गावांतील काही क्षेत्रांचे निवाडे तसेच भूसंपादन अद्याप झालेले नाही. त्यात पूर्व भागातील मावळ तालुक्यातील ६, पुरंदर आणि खेडमधील प्रत्येकी ५ तसेच हवेली तालुक्यातील १३ गावांमधील निवडक जमिनींचे मोबदल्याचे निवाडे व भूसंपादन रखडले आहे. तसेच पश्चिम भागातील मुळशी, हवेली तालुक्यातील प्रत्येकी ३ आणि भोरमधील एका गावातील काही क्षेत्राचे भूसंपादन अद्याप झालेले नाही.
दिवसे म्हणाले, “रिंगरोड जात असलेल्या मावळ, पुरंदर, हवेली, खेड, भोर या पाचही तालुक्यांतील काही जमिनींचे संपादन रखडले आहे. त्यामुळे जमिनी देण्यासाठी शेतकऱ्यांच्या संमती घेणे, संमती न दिल्यास सक्तीने भूसंपादनाचा प्रस्ताव देणे, संमतीनंतर निवाडा जाहीर करणे आणि थेट भूसंपादन करणे हे झालेले नाही. त्यामुळे या प्रक्रिया लवकरात लवकर पूर्ण करून येत्या ३१ डिसेंबरपर्यंत पूर्वेसह पश्चिमेकडील भूसंपादन प्रक्रिया पूर्ण करण्याचे आदेश दिले आहेत.”
संमती दिल्यानंतरही निवाडा जाहीर होऊन रक्कम घेण्यास तयार नसल्यास अशा शेतकऱ्यांची रक्कम कोर्टात जमा करावी. त्यानंतर कोर्टामार्फत संबंधित शेतकऱ्याकडून निवाडा स्वीकारणे आणि नंतर भूसंपादन करून घेण्याची प्रक्रिया पूर्ण करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.
पश्चिम भागातील कासार आंबोली, खेड शिवापूर तसेच खोपी गावातील काही जमिनींचे निवाडे तसेच भूसंपादन रखडले आहे. अतिरिक्त कामांसाठी दोन-तीन गावांमधील निवाड्याची प्रक्रिया सुरू आहे. त्याकडे लक्ष देण्यात येत आहे, असेही अधिकाऱ्यांनी स्पष्ट केले.












