न्युज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी-चिंचवड (दि. २ जानेवारी २०२६):- सायरनचा आवाज, लाल रंगाची धावती वाहने आणि लोकशाहीचा संदेश… या अनोख्या संगमातून पिंपरी चिंचवड शहरात आज अग्निशमन विभागाची मतदान जनजागृती रॅली उत्साहात पार पडली. या रॅलीच्या माध्यमातून ज्वाला विझवणाऱ्या हातांनी आज लोकशाही प्रज्वलित करीत मतदानाचा संदेश दिला. पिंपरी चिंचवड महापालिकेच्या वतीने आयोजित करण्यात आलेली ही मतदान जनजागृती रॅली शहरात लक्षवेधी ठरली.
पिंपरी चिंचवड महापालिकेच्या निवडणुकीत मतदानाची टक्केवारी वाढावी यासाठी महापालिका आयुक्त तथा निवडणूक अधिकारी श्रावण हर्डीकर यांच्या मार्गदर्शनाखाली तसेच अतिरिक्त आयुक्त तृप्ती सांडभोर, उपायुक्त अण्णा बोदडे यांच्या अधिपत्याखाली राबविण्यात येत असलेल्या स्वीप कार्यक्रमांतर्गत मतदान जनजागृती उपक्रम शहरातील विविध भागांत राबविण्यात येत आहेत. या अंतर्गत आज महापालिकेच्या अग्निशमन विभागाच्या वतीने मतदान जनजागृती रॅली काढण्यात आली.
निगडी येथील भक्ती शक्ती चौकातून सुरू झालेल्या या रॅलीमध्ये अतिरिक्त आयुक्त तृप्ती सांडभोर, उपायुक्त अण्णा बोदडे, व्यंकटेश दुर्वास, जनता संपर्क अधिकारी प्रफुल्ल पुराणिक यांच्यासह अग्निशमन विभागाचे जवान व नागरिक सहभागी झाले होते. या रॅलीमध्ये अग्निशमन विभागाच्या एकूण १४ अत्याधुनिक वाहनांचा समावेश होता. यामध्ये ५ देवदूत वाहने, ५ फायर बाईक, १ इसुझू वाहन, १ वॉटर मिस्ट, १ एएलपी (ALP) तसेच १ वॉटर ब्राऊझर यांचा समावेश होता. या सर्व वाहनांवर मतदान जनजागृतीचे संदेश झळकत होते. यावेळी ‘मतदार राजा जागा हो, लोकशाहीचा धागा हो…’, ‘मतदान हा तुमचा अधिकार आहे…’, ‘येत्या १५ जानेवारीला महापालिका निवडणुकीत नक्की मतदान करा…’ अशा घोषणांद्वारे नागरिकांमध्ये जागरूकता निर्माण करण्यात आली.
निगडी भक्ती शक्ती येथून सुरू झालेली ही रॅली खंडोबा चौक, चिंचवड स्टेशन, पिंपरी चिंचवड महापालिका मुख्य प्रशासकीय इमारत, संत तुकाराम नगरमार्गे नाशिक फाटा येथे पोहोचली. त्यानंतर नाशिक फाटा येथून पुन्हा संत तुकाराम नगरमार्गे पिंपरी चिंचवड महापालिका मुख्य प्रशासकीय इमारतीपर्यंत रॅली आली. रॅलीदरम्यान रस्त्याच्या दुतर्फा उभ्या असलेल्या नागरिकांनी या उपक्रमाला उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. यावेळी लोकशाही प्रक्रियेत प्रत्येक मताचे असलेले मोल, मतदान न केल्यास होणारे परिणाम तसेच जबाबदार नागरिक म्हणून मतदान करण्याची गरज याबाबत जनजागृती करण्यात आली.
पथनाट्य, फ्लॅश मॉबचे सादरीकरण
पिंपरी चिंचवड महापालिका मुख्य प्रशासकीय इमारतीमध्ये या मतदान जनजागृती रॅलीचा समारोप झाला. याप्रसंगी महापालिका अतिरिक्त आयुक्त तृप्ती सांडभोर, विक्रांत बगाडे, निवडणूक विभागाचे उपायुक्त सचिन पवार, उपायुक्त अण्णा बोदडे, व्यंकटेश दुर्वास, सीताराम बहुरे, संदीप खोत, सहाय्यक आयुक्त किरणकुमार मोरे, जनता संपर्क अधिकारी प्रफुल्ल पुराणिक यांच्यासह अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते. यावेळी उपस्थित नागरिकांसाठी मतदान जनजागृती पथनाट्याचे सादरीकरण करण्यात आले. तसेच फ्लॅश मॉबद्वारे प्रभावी संदेश देण्यात आला. पंकज सोनी, ऋतुजा खामकर, ईशा दहिवाळ, भूमी पलांडे, स्वरा परभाणे, काव्या पाटील, संचिता कांबळे यांनी फ्लॅश मॉबचे सादरीकरण केले.
त्यानंतर उपस्थित अधिकारी, कर्मचारी व नागरिकांनी “आम्ही, भारताचे नागरिक, लोकशाहीवर निष्ठा ठेवून याद्वारे प्रतिज्ञा करतो की, आपल्या देशाच्या लोकशाही परंपरांचे जतन करू आणि मुक्त, निःपक्षपाती व शांततापूर्ण वातावरणातील निवडणुकांचे पावित्र्य राखू. तसेच प्रत्येक निवडणुकीत निर्भयपणे तसेच धर्म, वंश, जात, समाज, भाषा यांच्या विचारांच्या प्रभावाखाली न येता किंवा कोणत्याही प्रलोभनास बळी न पडता मतदान करू,” अशी मतदानाची शपथ यावेळी उपस्थितांनी घेतली.
लोकशाही सशक्त करण्यासाठी प्रत्येक नागरिकाचा सहभाग अत्यंत महत्त्वाचा आहे. मतदान हा केवळ अधिकार नसून सामाजिक जबाबदारी आहे. अशा नाविन्यपूर्ण जनजागृती उपक्रमांमुळे नागरिकांमध्ये मतदानाविषयी सकारात्मक वातावरण निर्माण होत असून येत्या निवडणुकीत मतदार मोठ्या संख्येने मतदान करतील, असा आम्हाला विश्वास आहे.
– तृप्ती सांडभोर, अतिरिक्त आयुक्त, पिंपरी चिंचवड महापालिका.स्वीप उपक्रमांतर्गत राबविण्यात येणारे मतदान जनजागृती कार्यक्रम हे मतदारांपर्यंत थेट पोहोचण्याचे प्रभावी माध्यम ठरत आहेत. अग्निशमन विभागासारख्या शिस्तबद्ध आणि विश्वासार्ह यंत्रणेद्वारे दिलेला मतदानाचा संदेश नागरिकांच्या मनात ठसतो व लोकशाही प्रक्रियेत सक्रिय सहभागासाठी त्यांना प्रेरित करतो.
– अण्णा बोदडे, उपायुक्त, पिंपरी चिंचवड महापालिका.निवडणूक प्रक्रिया पारदर्शक, निर्भय व शांततापूर्ण वातावरणात पार पडण्यासाठी मतदारांची जागरूकता आवश्यक आहे. प्रत्येक मताचे महत्त्व नागरिकांपर्यंत पोहोचावे यासाठी विविध माध्यमांतून सातत्याने जनजागृती केली जात असून, अशा उपक्रमांमुळे मतदानाची टक्केवारी वाढण्यास निश्चितच मदत होईल.
– व्यंकटेश दुर्वास, उपायुक्त, पिंपरी चिंचवड महापालिका.












