न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. ०२ फेब्रुवारी २०२४) :- चिंचवड विधानसभा मतदारसंघातील शरद पवार गटाचे राहुल कलाटे यांनी ईव्हीएम मशीन पडताळणीसाठी अर्ज केला आहे. चिंचवडमधून जगताप हे एक लाखांपेक्षा अधिक मताधिक्याने विजयी झाले होते. यावर आक्षेप घेत राहुल कलाटे यांनी ईव्हीएम पडताळणीसाठी अर्ज केला आहे.
चिंचवड विधानसभा मतदारसंघात राज्यातील विविध ठिकाणी राहणाऱ्या मतदारांची संख्या जास्त आहे. चिंचवडमधील हजारो मतदार हे त्यांच्या मूळ गावी मतदानासाठी गेले तरी देखील चिंचवड मध्ये मतदानाचा टक्का वाढला कसा? असा प्रश्न राहुल कलाटे यांनी उपस्थित करत आक्षेप घेतला असून ईव्हीएम पडताळणीसाठी अर्ज केला आहे.
एक बूथ साठी जीएसटीसह तब्बल ४७ हजार रुपये मोजले आहेत. अशी एकूण २५ बूथ बाबत त्यांनी पैसे भरले आहेत. अशी माहिती राहुल कलाटे यांनी दिली आहे. अर्ज करून राहुल कलाटे यांना तीन – चार दिवस झाले असले तरी अद्याप तरी निवडणूक आयोग कडून त्यांना उत्तर मिळालेलं नाही. ४५ दिवसात उत्तर मिळणं अपेक्षित असल्याचं त्यांनी म्हटलं आहे. त्यामुळे ते निवडणूक आयोगाच्या उत्तराची प्रतीक्षा करत आहेत.











