- पिंपरी चिंचवड विद्यापीठाचा पहिला दीक्षांत समारंभ शनिवारी..
न्युज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी-चिंचवड (दि. १ जानेवारी २०२६):- पिंपरी चिंचवड विद्यापीठाचा पहिला दीक्षांत समारंभ शनिवारी, (दि. ३ जानेवारी) साते, वडगाव मावळ, जिल्हा पुणे येथील विद्यापीठाच्या कॅम्पसमध्ये आयोजित करण्यात आला आहे. हा पदवी प्रदान सोहळा म्हणजे, पिंपरी चिंचवड एज्युकेशन ट्रस्टच्या शैक्षणिक परिपक्वतेचे आणि सुदृढ व्यवस्थात्मक रचनेचे प्रतिबिंब आहे. पिंपरी चिंचवड विद्यापीठाने दर्जा, मूल्यनिष्ठा आणि बदलत्या ज्ञानविश्वाशी सुसंगत शिक्षण या आधारांवर एक भक्कम शैक्षणिक पायाभरणी केली आहे. हा दीक्षांत समारंभ उत्कृष्टता, सामाजिक योगदान, जागतिक शैक्षणिक सहभाग आणि शाश्वत विकासाच्या दीर्घकालीन प्रवासाची सुरुवात दर्शवितो असे पीसीयू चे कुलपती हर्षवर्धन पाटील यांनी सांगितले.
पिंपरी चिंचवड एज्युकेशन ट्रस्टच्या साते, वडगाव मावळ येथील पिंपरी चिंचवड विद्यापीठाने (पीसीयू) आपल्या शैक्षणिक प्रवासातील एक महत्त्वपूर्ण टप्पा म्हणून पहिला दीक्षांत समारंभ शनिवारी (३ जानेवारी २०२६) आयोजित केला आहे. यावेळी पीसीयू मधील बॅचच्या पदवी प्राप्त विद्यार्थ्यांना उद्योगपती प्रतापराव पवार यांच्या हस्ते पदवी प्रमाणपत्र प्रदान करून गौरविण्यात येणार आहे. हा क्षण विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक प्रवासातील परिपक्वतेचा आणि विद्यापीठाच्या शैक्षणिक बांधिलकीचा प्रतीक ठरणार आहे अशी माहिती पीसीयूचे कुलगुरू डॉ. संतोष सोनवणे यांनी प्रसिद्धीस दिला आहे.
साते, वडगाव मावळ, पुणे येथील पिंपरी चिंचवड विद्यापीठ कॅम्पस येथे आयोजित केलेल्या या सोहळ्यास पदवी प्राप्त विद्यार्थी, त्यांचे पालक, शिक्षणतज्ज्ञ, विद्यापीठाचे वरिष्ठ अधिकारी तसेच शैक्षणिक व औद्योगिक क्षेत्रातील प्रमुख पाहुणे उपस्थित राहणार आहेत. विद्यापीठाच्या इतिहासातील हा पहिलाच दीक्षांत समारंभ असल्याने, तो केवळ एक औपचारिक कार्यक्रम न राहता पीसीयूच्या शैक्षणिक अधिष्ठानाची आणि भविष्यातील दिशेची साक्ष देणारा महत्त्वाचा क्षण ठरणार आहे.
पीसीयूचा प्रथम पदवी प्रदान सोहळा पीसीईटीचे अध्यक्ष ज्ञानेश्वर लांडगे, उपाध्यक्ष पद्माताई भोसले सचिव विठ्ठल काळभोर खजिनदार शांताराम गराडे, व्यवस्थापन समिती सदस्य अजिंक्य काळभोर, नरेंद्र लांडगे, कार्यकारी संचालक डॉ. गिरीश देसाई यांच्या मार्गदर्शनाखाली आयोजित करण्यात आला आहे.












