- ६० दिवसांत ५२ कि.मी. आंतरराष्ट्रीय दर्जाचा सायकलिंग मार्ग विकसित…
न्युज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी-चिंचवड (दि. २ जानेवारी २०२६):- पुणे जिल्हा व पिंपरी चिंचवड शहरातून जाणाऱ्या पुणे ग्रँड टूर २०२६ या आंतरराष्ट्रीय सायकलिंग स्पर्धेसाठी पिंपरी चिंचवड महानगरपालिकेने अवघ्या ६० दिवसांत ५२ कि.मी. लांबीचा सायकलिंग मार्ग आंतरराष्ट्रीय दर्जाचा व यु.सी.आय (युनियन सायकलिस्ट इंटरनॅशनल) मानकांनुसार विकसित करून सज्ज केला आहे. पुणे ग्रँड टूर या आंतरराष्ट्रीय स्पर्धेची घोषणा सप्टेंबर २०२५ मध्ये झाली होती. मर्यादित कालावधीत रस्त्यांची पुनर्बांधणी, दर्जा नियंत्रण आणि आंतरराष्ट्रीय मानकांची पूर्तता करणे हे मोठे आव्हान होते. मात्र जिल्हाधिकारी कार्यालय, पुणे यांच्या समन्वयाने ऑनलाइन ट्रॅकिंग सिस्टीम व नियमित आढावा बैठका घेऊन हे काम वेळेत पूर्ण करण्यात आले.
पुणे ग्रँड टूर ही एकूण ४३७ कि.मी. लांबीची आंतरराष्ट्रीय सायकलिंग स्पर्धा असून, त्याचे ४ स्टेजेस आहेत त्यापैकी स्टेज-१ व स्टेज-४ मधील ५२ कि.मी. लांबीचा मार्ग पिंपरी चिंचवड शहरातून जातो आणि स्टेज-१ चा समारोप डी वाय पाटील कॉलेज आकुर्डी येथे होणार आहे.या मार्गावरील रस्ते यु.सी.आय (युनियन सायकलिस्ट इंटरनॅशनल) आणि सी.एफ.आय (सायकलिंग फेडरेशन ऑफ इंडिया) यांनी निश्चित केलेल्या आंतरराष्ट्रीय मानकांनुसार विकसित करण्यात आले आहेत. या प्रकल्पासाठी सुमारे ६१.४० कोटी रुपये खर्च करण्यात येणार असून, रस्त्यांची कामे तीन स्वतंत्र भागांमध्ये विभागून कंत्राटदारांना ६० दिवसांची मुदत देण्यात आली होती. अंदाजपत्रक तयारीपासून पारदर्शक निविदा प्रक्रिया व प्रत्यक्ष अंमलबजावणीपर्यंत सर्व टप्पे केवळ तीन महिन्यांत पूर्ण करण्यात आले. सायकलिंगसाठी आवश्यक असलेला २ ते २.५ मीटर/किलोमीटर राईड क्वालिटी निर्देशांक (आयआरआय) साध्य करण्यासाठी सर्व रस्त्यांचे डांबरीकरण/री- सर्फेसिंग करण्यात आले. शहरातील मुख्य मार्गांवर असलेल्या ५०० हून अधिक युटिलिटी चेंबर्स रस्त्याच्या पृष्ठभागाशी समतल करणे हे मोठे तांत्रिक आव्हान होते. यासाठी पिंपरी चिंचवड महानगरपालिकेने मॅनहोल व चेंबर्ससाठी नवीन मानक कार्यपद्धती (एसओपी) विकसित करून अंमलात आणली. सुरक्षित
सायकलिंगमुळे या कामाला नागरिक व तज्ज्ञांकडून सकारात्मक प्रतिसाद मिळत असून, ही मानक कार्यपद्धती आता शहरातील इतर रस्त्यांवरही लागू करण्यात येत आहे.
रस्त्यांच्या कामादरम्यान पाणीपुरवठा, ड्रेनेज, वीज, सीसीटीव्ही केबल्स अशा विविध भूमिगत सुविधांचा समन्वय साधण्यात आला. वाहतूक कोंडी टाळण्यासाठी रात्रीच्या वेळेत कामे करण्यात आली असून, वाहतूक पोलिसांच्या
समन्वयाने आवश्यक बदल करण्यात आले. याशिवाय फुटपाथ दुरुस्ती करणे, गतिरोधक व रंबल स्ट्रिप्स काढून टाकणे, कर्ब व दुभाजक रंगविणे, आंतरराष्ट्रीय दर्जाची रस्ता चिन्हे, पेंट मार्किंग करणे, सिग्नल नूतनीकरण तसेच शहराच्या सौंदर्यात भर घालण्यासाठी भित्तीचित्रे, सायकल शिल्पे, सायकल स्टॅंड, बस स्टॅाप, झाडे व झुडपे लावण्याची कामे करण्यात आली आहेत.
स्थापत्य अभियांत्रिकी विभागाची संपूर्ण टीम, अभियंते, कंत्राटदार व प्रकल्प व्यवस्थापन सल्लागार यांच्या २४x७ कार्यपद्धतीतून अवघ्या ६० दिवसांत हा महत्त्वाचा प्रकल्प अंतिम टप्प्यात आणण्यात आला आहे. पुणे ग्रँड टूर अंतर्गत विकसित झालेले हे रस्ते पुढील अनेक वर्षे नागरिकांना सुरक्षित व खड्डेमुक्त प्रवास देतील. त्याचबरोबर भविष्यात अशा आंतरराष्ट्रीय दर्जाच्या क्रीडा स्पर्धांचे यशस्वी आयोजन करण्याची पिंपरी चिंचवड महानगरपालिकेची क्षमता या प्रकल्पातून अधोरेखित झाली आहे.
पुणे ग्रँड टूर २०२६ ही केवळ सायकलिंग स्पर्धा नसून, पिंपरी चिंचवड शहराच्या पायाभूत सुविधा, नियोजन क्षमता आणि आंतरराष्ट्रीय दर्जाची कामे वेळेत पूर्ण करण्याची क्षमता दाखवणारा प्रकल्प आहे. अत्यंत मर्यादित कालावधीत ५२ किलोमीटरचे रस्ते यु.सी.आय मानकांनुसार विकसित करणे हे मोठे आव्हान होते. मात्र महापालिकेच्या अभियंता टीमने आणि सर्व संबंधित यंत्रणांच्या समन्वयातून हे काम गुणवत्तेसह पूर्ण केले. या रस्त्यांचा लाभ स्पर्धेनंतरही नागरिकांना सुरक्षित आणि खड्डेमुक्त प्रवासासाठी दीर्घकाळ मिळणार आहे.
– श्रावण हर्डीकर, आयुक्त, पिंपरी चिंचवड महानगरपालिका.पुणे ग्रँड टूर २०२६ साठी अवघ्या ६० दिवसांत ५२ कि.मी. आंतरराष्ट्रीय दर्जाचा सायकलिंग मार्ग विकसित करणे हे तांत्रिकदृष्ट्या अत्यंत आव्हानात्मक होते. यु.सी.आय व सी.एफ.आय मानकांनुसार राइड क्वालिटी सुधारणे, रस्त्यांची समतलता व सुरक्षितता सुनिश्चित करण्यावर विशेष भर देण्यात आला. विविध विभागांतील भूमिगत सुविधांचा समन्वय साधत, वाहतूक अडथळे टाळून कामे वेळेत पूर्ण करण्यात आली. या प्रकल्पातून पिंपरी चिंचवड महानगरपालिकेची कार्यक्षमता, नियोजन व गुणवत्तेची बांधिलकी स्पष्टपणे दिसते आणि त्यासाठी पिंपरी चिंचवड वाहतूक पोलीस विभागाचे विशेष साह्य मिळाले.
– बापूसाहेब गायकवाड, सह शहर अभियंता, पिंपरी चिंचवड महानगरपालिका.











