- बैठी घरं, सोसायटीतील मतदारांचा मिळतोय उत्स्फूर्त प्रतिसाद…
संतोष जराड :- प्रतिनिधी…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी-चिंचवड (दि. ०२ जानेवारी २०२६) :- पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या येत्या १५ जानेवारीला होणाऱ्या सार्वत्रिक निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर प्रभाग क्रमांक २२ (काळेवाडी–विजयनगर–नढेनगर–कोकणेनगर–पवनानगर) येथे भारतीय जनता पार्टीच्या अधिकृत उमेदवारांच्या प्रचाराला वेग आला आहे. क जागेवरील सर्वसाधारण गटातील उमेदवार विनोद जयवंत नढे आणि ड जागेवरील सर्वसाधारण गटातील उमेदवार हर्षद सुरेश नढे यांनी संयुक्त प्रचार मोहीम राबवत मतदारांपर्यंत थेट पोहचण्याचा धडाका लावला आहे.
गुरुवारी (दि. ०१) रोजी घेण्यात आलेल्या प्रचार दौऱ्यात राजवाडेनगर परिसरातील परमवीर कॉलनी, साईश्रद्धा, जयहिंद तसेच गंगाराम माने शाळेजवळील भागात बैठी घरं, सोसायटी आणि परिसरातील नागरिकांशी संपर्क साधण्यात आला. या दरम्यान नागरिकांशी संवाद साधत प्रभागातील सुरू असलेली तसेच प्रस्तावित विकासकामे, मूलभूत सुविधा आणि येणाऱ्या काळातील विकासकामांचा प्राधान्यक्रम याबाबत माहिती देण्यात आली.
“प्रभाग स्मार्ट करणे, रस्ते, पाणी, ड्रेनेज, प्रकाशयोजना आणि सार्वजनिक सोयी-सुविधांची उभारणी हा आमचा मुख्य अजेंडा आहे. विकासाच्या बळावरच आम्ही मतदारांची सेवा करणार आहोत,” असा विश्वास विनोद नढे आणि हर्षद नढे या उमेदवारांनी व्यक्त केला.
प्रचारादरम्यान स्थानिक नागरिक, महिला आणि तरुणांचा भरघोस प्रतिसाद पाहायला मिळाला. काही ठिकाणी नागरिकांनी स्थानिक समस्याही मांडल्या असून त्यांचे त्वरित समाधान करण्याचे आश्वासन उमेदवारांकडून देण्यात आले. आगामी मतदानात भाजपच्या उमेदवारांना पाठिंबा देऊन प्रभागातील विकासकामांना गती देण्याचे आवाहन यावेळी करण्यात आले.











