न्युज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (०४ डिसेंबर २०२४):- महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीचा निकाल २३ नोव्हेंबर रोजी जाहीर करण्यात आला. या निवडणुकीत महाराष्ट्रातील मतदारांनी महायुतील बहुमत दिल्यानंतर आता मुख्यमंत्री कोण होणार याच्या चर्चा सुरू होत्या . यानंतर आज (४ डिसेंबर) राज्याच्या मुख्यमंत्रीपदी देवेंद्र फडणवीस यांच्या नावाची घोषणा करण्यात आली आहे. आता उद्या (५ डिसेंबर) रोजी मुंबईतील आझाद मैदान येथे फडणवीस मुख्यमंत्री पदाची शपथ घेणार आहेत.
भाजपाच्या बैठकीत विधिमंडळ पक्षाचे नेते म्हणून देवेंद्र फडणवीस यांच्या नावाचा ठराव आज मंजूर करण्यात आला. यानंतर फडणवीस हेच राज्याचे नवे मुख्यमंत्री असणार यावर शिक्कामोर्तब झाले. दरम्यान मुख्यमंत्री पदासाठी नाव जाहीर झाल्यानंतर फडणवीसांनी तीन वेळा मुख्यमंत्री पदावर बसवल्याबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे आभार मानले.
दिल्लीमध्ये देवेंद्र फडणवीस आणि एकनाथ शिंदे हे अमित शाहांना भेटायला गेल्याच्या सहा दिवसानंतर काल पुन्हा एकदा फडणवीस आणि शिंदे समोरासमोर भेटले. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, एकनाथ शिंदे यांनी सरकारमध्ये सामील व्हावे, यासाठी देवेंद्र फडणवीसांनी त्यांची समजूत काढली असल्याचे समजते. केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारमण आणि गुजरातचे मुख्यमंत्री विजय रुपाणी यांनी निरीक्षक पद भुषविलेल्या बैठकीत देवेंद्र फडणवीस यांच्या नावावर शिक्कामोर्तब करण्यात आले.
यानंतर आभार प्रदर्शनाच्या भाषणात देवेंद्र फडणवीस यांनी अनेक राजकीय घडामोडींबद्दल भाष्य केले. तसेच सरकार स्थापन केल्यानंतर काही गोष्टींचा त्याग करावा लागेल, असे सुतोवाच त्यांनी केले.
देवेंद्र फडणवीसांनी महाराष्ट्रातील विजयाचे श्रेय प्रदेश भाजपाच्या सर्व नेत्यांना, कार्यकर्त्यांना दिले. “भाजपा पक्ष पूर्ण ताकदीने मैदानात असल्यामुळेच हा विजय मिळाला. तुम्ही सगळे आहात म्हणूनच मी इथे आहे. तुम्ही नसता तर मी इथे नसतो. पुढची वाट ही आपल्या अपेक्षा पूर्ण करण्यासाठी संघर्षाची आहे. आपले महायुतीचे सरकार आहे. त्यामुळे आपल्याला सर्वांना एकत्र घेऊन जावे लागेल. तसेच ज्यावेळी इतके मोठे बहुमत असते, तेव्हा सर्वांच्या मनातील गोष्टी पूर्ण करता येत नाहीत”, असेही देवेंद्र फडणवीस म्हणाले.












