- ठेकेदाराच्या विरोधात पोलीसात गुन्हा दाखल..
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. १८ डिसेंबर २०२४) :- पुनावळेतील जांभे रोड येथील बिल्डींग साईटवर काम सुरू होते. त्यावेळी तात्पुरत्या स्वरूपात उभा राहण्यासाठी केलेले लोखंडी स्टॅन्ड ब्रैकेट खालील बाजुस सरकल्याने कामगाराचा साईटवरून खाली पडून मृत्यु झाला आहे.
सुरक्षेच्या दृष्टीने काम करत असलेल्या ठिकाणी नेट जाळीही घटनास्थळी लावण्यात आलेली नव्हती. त्यामुळे कामगाराच्या डोक्यास, हाताला व इतर ठिकाणी गंभीर दुखापत झाल्यामुळे त्याचा मृत्यु झालेला आहे.
आजाद अली (वय २२ वर्षे रा. बैरगाची, पोस्ट- अंधारीया, ता. करनदिघी जि. उत्तर दिनाजपुर राज्य पश्चिम बंगाल) असे मयताचे नाव आहे. हा प्रकार (दि ०७) रोजी सकाळी ११:३० वा. एच.एस. ग्रुप, एच.एस. प्रिविटुड होम्स साईट, जांभे रोड, पुनावळे येथे घडला.
याप्रकरणी जलालुदीन इयाद अली (वय ५१ वर्षे, धंदा मजुरी, रा. बैरगाची, राज्य- पश्चिम बंगाल) यांनी मन्सुख मोडजी छाबीया ( वय ४४ वर्षे, धंदा बांधकाम कॉन्ट्रक्टर, वारजे माळवाडी) याच्या विरोधात फिर्याद दिली आहे. याप्रकरणी रावेत पोलीसांनी ५२३/२०२४ भारतीय न्याय संहिता कलम १०६ (१) प्रमाणे आरोपीच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे. पोउपनि खिळे पुढील तपास करीत आहेत.














