- तर, काही मोजकी खाती वगळता पवार आणि शिंदेंची दुय्यम दर्जाच्या खात्यावर बोळवण…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
मुंबई (दि. २२ डिसेंबर २०२४) :- महायुती सरकारचे बहुचर्चीत खातेवाटप शनिवारी जाहीर झाले आहे. खाते वाटपावर लक्ष टाकले असता सर्व महत्वाची खाती ही भाजपला आपल्याकडे ठेवण्यात यश आलं आहे. भाजपने गृह, महसूल, उर्जा, जलसंपदा, सार्वजनिक बांधकाम ही महत्वाची खाती आपल्याकडे ठेवली आहेत. तर एकनाथ शिंदे आणि अजित पवार यांच्याकडे काही मोजकी खाती सोडली तर दुय्यम दर्जाची खाती त्यांच्या वाट्याला आली आहेत.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आपल्याकडे गृह खाते ठेवले आहे. त्या बरोबर उर्जा, सामाजिक प्रशासन,माहिती आणि जनसंपर्क ही खाती स्वत:कडे ठेवली आहेत. तर चंद्रशेख बानवकुळे यांच्याकडे महसूल मंत्रिपदाची जबाबदारी देण्यात आली आहे. तर मागील वेळी महसूल मंत्री असलेल्या राधाकृष्ण विखे पाटील यांच्याकडे जलसंपदा खातं सोपवण्यात आलं आहे. चंद्रकांत पाटील यांच्याकडे उच्च तंत्र शिक्षण खातं कायम ठेवण्यात आलं आहे. अशोक उईके यांना आदिवासी विकास हे खातं देण्यात आलं आहे. तर शिवेंद्र राजे भोसले यांच्याकडे सार्वजनिक बांधकाम विभागाची कमान असेल. ग्रामिण भागाला जोडण्यासाठी महत्वाचं समजलं जाणारं ग्रामविकास खातंही भाजपने आपल्याकडे ठेवले आहे. या खात्याची जबाबदारी जयकुमार गोरे यांच्यावर असणार आहे. त्यामुळे खाते वाटपात भाजपचा वरचष्मा दिसून येत आहे.
उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे गृह खात्यासाठी आग्रही होते. पण त्यांना ते खातं मिळालं नाही. पण त्यांना नगरविकास खातं मिळालं आहे. त्याच बरोबर शिंदे यांनी गृह निर्माण हे तितकेच महत्वाचे खाते पदरात पाडून घेतले आहे. सार्वजनिक उपक्रम हे खातं ही त्यांच्याकडे असणार आहे. या शिवाय मागिल मंत्रिमंडळात असलेली जवळपास तिच खाती शिंदेंच्या शिवसेनेला मिळाली आहेत. त्यात कोणताही मोठा बदल दिसत नाही. गुलाबराव पाटील यांना पाणी पुरवठा आणि स्वच्छता मंत्रालय मिळालं आहे. दादा भूसे यांना शिक्षण खातं मिळालं आहे. मागिल वेळी ते केसरकरांकडे होते. संजय राठोड यांना मृदू संधारण खात्याचे मंत्री करण्यात आले आहे. उदय सामंत यांच्याकडे उद्योग खातं कायम ठेवण्यात आले आहे. तर शंभूराज देसाई यांना पर्यटन खात्यावर समाधान मानावं लागलं आहे. मंत्रिपदासाठी बाशिंग बांधून असलेल्या संजय शिरसाट यांना चांगलं खातं मिळालं आहे. त्यांच्या पदरात सामाजिक न्याय हे खातं पडलं आहे. तर भरत गोगावले हे रोजगार हमी मंत्री असतील. प्रताप सरनाईक परिवहन मंत्री असतील. प्रकाश आबिटकर आरोग्य मंत्री असतील. नगरविकास, गृहनिर्माण, सामाजिक न्याय, शालेय शिक्षण,उद्योग ही महत्वाची खाती शिंदेंना आपल्या पदरात पाडून घेण्यात यश आलं आहे.
खाते वाटपात महत्वाची खाती भाजपच्या वाट्याला गेली आहेत. अशा वेळी तिजोरीच्या चाव्या आपल्या हातात ठेवण्यात अजित पवार यशस्वी झाले आहेत. अपेक्षे प्रमाणे अर्थ आणि नियोजन खात्याची जबाबदारी अजित पवारांना दिली आहे. शिवाय त्यांच्याकडे राज्य उत्पादन शुल्क खाते असणार आहे. त्या शिवाय आदिती तटकरे यांच्याकडे महिला बाल विकास हे खाते कायम ठेवण्यात आले आहेत. तर धनंजय मुंडे यांच्याकडचे कृषी खाते माणिकराव कोकाटे यांना देण्यात आले आहे. तर धनंजय मुंडे यांच्याकडे अन्न आणि नागरी पुरवठा हे खातं देण्यात आलं आहे. दत्तात्रय भरणे यांना क्रीडा आणि युवक कल्याण खातं देण्यात आलं आहे. नरहरि झिरवाळ यांना अन्न आणि औषध प्रशासनाची जबाबदारी देण्यात आली आहे. मकरंद जाधव यांना मदत आणि पुनर्वसन खातं देण्यात आलं आहे. तर बाबासाहेब पाटील यांच्याकडे सहकार खात्याची जबाबदारी देण्यात आली आहे. अर्थ, उत्पादन शुल्क, सहकार,कृषी, महिला बाल विकास सारखी महत्वाची खाती अजित पवारांच्या राष्ट्रवादीला मिळाली आहेत
















2 Comments
tlovertonet
I have recently started a blog, the info you provide on this site has helped me greatly. Thanks for all of your time & work.
Slideout Shelves
I have recently started a web site, the info you provide on this web site has helped me tremendously. Thanks for all of your time & work. “The only winner in the War of 1812 was Tchaikovsky” by Solomon Short.