न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. १४ मे २०१९) :- प्राधिकरणातील बिग इंडिया चौक येथे रहदारीच्या परिसरात महावितरणचा ट्रांन्सफार्मर आहे. तो धोकादायक अवस्थेत असून, तो केव्हाही कोसळू शकतो. त्यामुळे तो त्वरित हटविण्यात यावा, अशी मागणी भाजपा महिला मोर्चा प्रमुख व मिडिया सेल अध्यक्षा कोमल संतोष काळभोर यांनी पत्राद्वारे महावितरण कार्यालयाकडे केली आहे.
या पत्रात त्यांनी म्हटले आहे की, सेक्टर क्र: २६ प्लॉट क्र: १२२ बिग इंडिया चौक येथे रहदारीच्या परिसरात महावितरणचा ट्रांन्सफार्मर आहे. यामुळे मागील काळात या ठिकाणी छोट्या छोट्या अपघाताच्या घटना घडल्या आहेत. भविष्यात या ठिकाणी मोठा अपघात घडू शकतो. हा ट्रान्सफार्मर नागरिकांसाठी धोकादायक आहे. स्थानिक नागरिकांनीही वेळोवेळी संबंधीत महावितरण अधिकाऱ्यांना तक्रार दिली होती. परंतु याची योग्य दखल घेतली गेली नाही.
काळभोर यांनी स्थानिक डिव्हिजन अभियंता कवडे व भोसरी मुख्य अभियंता राहुल गवारे यांच्याशी सविस्तर सकारात्मक चर्चा करून, या विषयाची संपूर्ण कागदपत्रासह माहिती देऊन, त्यांना मागणीचे निवेदन दिले आहे व तात्काळ महावितरणचा ट्रांन्सफार्मर परिसरातून हटविण्याची मागणी या पत्रातून केली आहे.


















