न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. ०६ जानेवारी २०२५) :- जगताप डेअरी येथे एका खासगी आराम बसला आग लागली. ही घटना रविवारी (दि. ५) सकाळी सव्वासहाच्या सुमारास घडली. सुदैवाने बसमधील सातही प्रवाशांना वेळेत खाली उतरवण्यात आल्यामुळे कोणतीही जीवितहानी झाली नाही. मात्र, आग इतकी भीषण होती की बस जळून खाक झाली.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, भोसरीकडे जाणारी बस नेहमीप्रमाणे प्रवाशांना घेऊन जात असताना, जगताप डेअरीजवळ बसच्या मागील भागातून अचानक धूर येऊ लागला. चालकाच्या लक्षात येताच त्याने तातडीने बस रस्त्याच्या कडेला थांबवली आणि प्रवाशांना खाली उतरवण्यासाठी सूचना दिल्या. धूर दिसताच प्रवाशांमध्ये घबराट निर्माण झाली. मात्र, चालकाच्या प्रसंगावधानामुळे प्रवाशांना सुरक्षितरीत्या बाहेर काढण्यात आले.
बसने पेट घेतल्याचे समजताच पिंपरी-चिंचवड अग्रिशामक दलाच्या रहाटणी केंद्रातील बंबाला पाचारण करण्यात आले. अग्निशामक दलाच्या जवानांनी तातडीने घटनास्थळी पोहोचून आगीवर नियंत्रण मिळवले; मात्र तोपर्यंत बस संपूर्णतः जळून खाक झाली होती. अग्निशामक दलाच्या तत्परतेमुळे आगीचा परिसरातील इतर वाहनांना आणि नागरिकांना धोका पोहोचला नाही. शॉर्टसर्किटमुळे ही आग लागल्याचा प्राथमिक अंदाज अग्निशामक दलाच्या जवनांनी व्यक्त केला आहे.













