न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. १५ मे २०१९) :- मनसेचे भोसरी विधानसभा अध्यक्ष राहूल जाधव यांनी पाणीटंचाईबाबत महापालिका आयुक्त श्रावण हर्डिकर यांना पत्र दिले आहे. दिलेल्या पत्रात त्यांनी म्हटले आहे की, राज्यात दुष्काळी अस्मानी संकट ओढावले आहे. सर्वत्र पाण्याचा तुटवडा आहे. तसेच पिंपरी चिंचवड शहराला पाणी पुरवठा करणा-या पवना धरणातही १५ जुलैअखेर कमी पाणी साठा उपलब्ध आहे.
महापालिकेने पाणी पुरवठा दिवसाआड केला. तसेच नागरिकही पाण्याचा काटकसरीने वापर करुन बचत करीत आहेत. पाणी बचतीसाठी महापालिका देखील जनजागृती करीत आहे. अनेक प्रभागात पाण्याचे राजकारण सुरु आहे. भोसरी विधानसभा मतदारसंघातील जाधववाडी, चिखली, कुदळवाडी यासह अनेक भागात महापालिकेच्या पाणी पुरवठा कर्मचा-यांना हाताशी धरुन, पाण्याचे राजकारण होवू लागले आहे. मतदारांना त्रास देवून त्यानंतर स्वखर्चातून टॅकर पाठवून लोकप्रतिनिधी मतदाराची सहानभुती मिळवू लागले आहेत. विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर पाण्यातही राजकारण करुन, मतदारांना महापालिकेच्याच टॅकरचे पाणी देवून लोकनायक बनण्याचा प्रयत्न काही जनसेवक करु लागले आहेत, असा आरोप त्यांनी सत्ताधाऱ्यांवर केला आहे. त्यामुळे कमी-अधिक पाणी सोडून कृत्रिम पाणी टंचाई निर्माण करण्याचे प्रमाण वाढले आहे.
सत्ताधाऱ्यांना गेल्या चार वर्षात पाणी प्रश्नासह विकास कामे करता आली नाहीत. मात्र, विधानसभा निवडणुका डोळ्यासमोर ठेवून टॅकर पुरवठा करण्यासाठी लोकप्रतिनिधी सर्वत्र धावू लागले आहेत. पालिका कर्मचा-यांना मतदारसंघातील पुर्व, पश्चिम, दक्षिण आणि उत्तर भागात पाणी पुरवठा हा आठवड्यातून एक-दोन वेळा अर्धा व्हॉल्व सोडण्यात येतो. पाणी पुरवठा कमी झाल्याने नागरिकांमध्ये संताप निर्माण होतो. पाणी कमी आल्याने नागरिकांच्या तक्रारी वाढतात.
लोक नगरसेवकांकडे गा-हाणे मांडायला जातात. त्यानंतर नगरसेवक हे अधिका-यांना फोन करुन पाण्याची विचारणा करतात. नागरिकांचे समाधान करुन उद्या पाणी सुरळीत येईल, आता तुमच्याकडे टॅकर पाठवून देतो, असे सांगून त्यांना शांत केले जात आहे. दरम्यान, महापालिका आयुक्तांनी सदरील कृत्रिम पाणी टंचाईची चौकशी करुन, नागरिकांना होणा-या त्रासापासून मुक्तता करावी. तसेच पाणी कमी सोडणा-या कर्मचारी व अधिका-यावर कारवाई करावी, अशी मागणी राहूल जाधव यांनी या पत्रात केली आहे.











