न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. १६ मे २०१९) :- मावळ व शिरूर लोकसभा मतदारसंघात २९ एप्रिलला मतदान झाले. त्यानंतर सर्व ईव्हीएम मशिन क्रीडानगरीतील स्ट्रॉगरूममध्ये अतिसुरक्षा व्यवस्थेत ठेवण्यात आल्या आहेत, असे असले तरी, राजकीय उमेदवारांच्या मनात अनेक शंका आहेत. ईव्हीएम मशिनमध्ये काही गडबड होऊ नये म्हणून त्यांनी खासगी हेर नेमले आहेत. त्यामुळे क्रीडानगरीत ये-जा करणाऱ्या अधिकारी, कर्मचा-यांपासून खेळाडूंवर नजर ठेवली जात आहे. या कृतीची राजकीय वर्तुळात जोरदार चर्चा रंगली आहे.
या दरम्यान सुरक्षा व्यवस्था अधिक वाढविण्यात येणार आहे. त्याकरिता दक्षता म्हणून म्हाळुगे-बालेवाडीच्या श्री छत्रपती क्रीडा संकुलाच्या सीमाभितीवर उंच पत्रे लावले जाणार आहेत. तसेच, शिवसेना व राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या कार्यकतर्त्यामध्ये वाद व भांडणे होऊ नये याची खबरदारी म्हणून त्यांची वेगवेगळी व्यवस्था केली जाणार आहे.
या दोन्ही मतदारसंघांची मोजणी क्रीडा संकुलातील बॅडमिंटन हॉलमध्ये सकाळी आठला सुरू होणार आहे. सध्या येथील स्ट्राँगरूमला छावणीचे स्वरूप आले आहे. मतमोजणीच्या दिवशी मोठ्या संख्येने राजकीय पक्षाचे प्रतिनिधी व कार्यकर्ते साट सकाळपासूनच जमा होण्याची दाट शक्यता आहे. क्रीडासंकुलाची सीमा भिंतीची उंची कमी आहे. त्यामुळे कार्यकर्ते क्रीडासुंकलात प्रवेश करू शकतात. परिणामी पोलिसांचा ताण वाढू शकतो. त्यामुळे दक्षता म्हणून क्रीडा संकुलाच्या चारही बाजूच्या भितीवर उंच पत्रे लावावेत, अशी मागणी हिजवडी पोलिसांनी सार्वजनिक बांधकाम विभागाकडे केली आहे.











