न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. १५ मे २०१९) :- ‘मी आता दंडाची रक्कम भरलेली आहे. पण, तुला नंतर पाहून घेईन. तुझ्या साहेबाला देखील पाहून घेईल’ अशी धमकी डॉक्टरने महापालिका कर्मचा-यांना दिली.
पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या आरोग्य विभागाने कुदळवाडीतील लोटस मल्टीस्पेशालिटी रुग्णालयावर वैद्यकीय कचरा (बायोमेडिकल वेस्ट) उघड्यावर टाकल्याप्रकरणी दंडात्मक कारवाई केली. त्यांच्याकडून पाच हजार रुपयांचा दंड वसूल केला आहे. ही कारवाई आज (बुधवारी) करण्यात आली. यावेळी ही घटना घडली.
‘क’ क्षेत्रीय कार्यालयाचे आरोग्य कर्मचारी मारुती शिंदे यांनी कुदळवाडी येथील लोटस मल्टीस्पेशालिटी रुग्णालयाचे कर्मचारी आज (बुधवारी) बायोमेडिकल वेस्ट उघड्यावर टाकताना समक्ष पाहिले. यानंतर आरोग्य निरीक्षक वैभव गौडा यांनी पाहणी केली. पाहणी केल्यानंतर लोटस हॉस्पिटलच्या डॉ. वैभव लाडे यांना घटनास्थळी बोलावून दंड ठोठावला. मात्र डॉ. लाडे यांनी मनपा कर्मचा-यांना दमदाटी केली. ‘आता दंड भरला मात्र, नंतर पाहून घेतो’ अशी दमबाजी आरोग्य कर्मचा-यांना केल्याचे आरोग्य वैद्यकीय अधिकारी डॉ. अनिल रॉय यांनी सांगितले.
महापालिका आरोग्य कर्मचारी यांना दंडाची पावती मागितली असता, त्यांनी पावती देण्यास टाळाटाळ केली. तसेच विनापावती दंडासाठी मला त्या कर्मचाऱ्यांनी प्रवृत्त केले. परंतु, मी त्यांच्या प्रयत्नांना भुललो नाही. तसेच पावतीसाठी कार्यालयात गेलात तर, वाढीव दंड भरावा लागेल. त्यामुळे बाहेरच तडजोड करा, असे त्या कर्मचाऱ्यांनी मला सुनावले. कार्यालयात गेल्यानंतरही दंड स्वीकारण्यास विलंब केला. विलंबामुळे रुग्णालयातील रुग्णांना नाहक त्रास सहन करावा लागला. त्या कर्मचाऱ्यांना मी कोणतेही अपशब्द वापरले नाहीत. – डॉ. वैभव लाडे (लोटस हॉस्पिटल, कुदळवाडी)











