- पिंपरी-चिंचवड महापालिकेत दोन सदनकांची नोंद…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. 17 जानेवारी 2025) :- बीड जिल्ह्यातील मस्साजोग येथील सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येच्या कटातील प्रमुख संशयित आणि मकोका कायद्याखाली अटक असलेल्या वाल्मीक कराडच्या नावे पिंपरी चिंचवडमध्ये दोन आलिशान फ्लॅट असल्याची माहिती पुढे आली आहे.
त्यातील एका फ्लॅटचा कर थकवल्याप्रकरणी महापालिकेने जप्तीची प्रक्रिया सुरू करताच गुरुवारी कराचा भरणा करण्यात आला, तर दुसऱ्या फ्लॅटचाही चालू वर्षाचा कर भरण्यात आला.
पिंपरी- चिंचवड शहरातील वाकड येथील पार्क स्ट्रीट या उच्चभ्रू सोसायटीत ‘आयव्हरी’ इमारतीत वाल्मीक कराड आणि पत्नी पत्निच्या नावे ‘फोर-बीएचके’ फ्लॅट जून २०२१ मध्ये खरेदी करण्यात आला.
सहाव्या मजल्यावरील ६०१ क्रमांकाच्या<span;> या फ्लॅटची किंमत ३.१५ कोटी रुपयांपेक्षा अधिक आहे. आतापर्यंत या आलिशान फ्लॅटसाठी एक रुपयाचाही कर भरण्यात आला नव्हता. मात्र, महापालिकेने जप्तीची नोटीस दिल्यानंतर गुरुवारी (दि.१६) १ लाख ५५ हजार ४४४ रुपयांचा थकीत कर भरण्यात आला.
त्याशिवाय वाकडमध्येच पिंक सिटी रोडवरील ‘कासा बेला’ सोसायटीतील ४०३ क्रमांकाच्या फ्लॅटवरही वाल्मीक कराडच्या नावाची पाटी आहे. १ एप्रिल २०१६ पासून हा ‘टू-बीएचके’ फ्लॅट पत्नी च्या नावे असल्याची नोंद महापालिकेच्या करसंकलन विभागाकडे आहे. या फ्लॅटचा कर मात्र नियमित भरला जायचा.
चालू वर्षातील कराचा २० हजार ६७१ पैकी ९ हजार ६८७ रुपयांचा पहिला हप्ता भरण्यात आला आहे, तर उर्वरित कर भरलेला नव्हता. गुरुवारी कराड कुटुंबीयांनी हे दोन्ही थकीत कर ऑनलाइन पद्धतीने भरल्याची माहिती महापालिकेने दिली. त्यामुळे जप्तीची कारवाई थांबवल्याची माहिती सहायक आयुक्त अविनाश शिंदे यांनी दिली.












