न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. १६ मे २०१९) :- च-होली येथील काळेभिंत परिसरात गेल्या चार ते पाच महिन्यांपासून पाण्याची टंचाई जाणवत आहे. या परिसरास चार ते पाच दिवसांनी पाण्याचा टैंकर मिळत आहे. महापालिका प्रशासनाला याबाबत वारंवार निवेदन देऊनही पाणी टंचाईवर मार्ग निघत नसल्याने काळेभिंतवासिय हतबल झाले आहेत.
पुणे-आळंदी रस्त्यावर डाव्या बाजूला काळेभिंतचा परिसर आहे. च-होली प्रभाग क्रमांक ३ मध्ये येणा-या या परिसरात सुमारे चारशे जण वास्तव्यास आहेत. गेल्या अनेक वर्षांपासून या भागास पाण्याचा प्रश्न भेडसावत आहे.
या प्रश्नाने सध्या तीव्र स्वरूप धारण केले आहे. दिवसा आड पाणी पुरवठा सुरू झाला आहे. सध्या काळेभिंत येथे टँकरने पाणीपुरवठा करण्यात येत आहे. परंतु, टँकरचे पाणी अपुरे पडत असल्याने पाण्याचा प्रश्न जटील बनला आहे. त्यामुळे महापालिका प्रशासनाने याची दखल घ्यावी, अशी नागरिकांमधून मागणी होत आहे.











