न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. १६ मे २०१९) :- पिंपरी चिंचवड महापालिकेच्या वतीने उद्यमनगर, पिंपरी येथे झोपडपट्टी पुनर्वसन प्रकल्प (एसआरए) राबविला जात आहे. त्यास उद्यमनगर बचाव कृती समितीने विरोध केला आहे. हा प्रकल्प पालिकेने त्वरित पूर्ण करून झोपडीधारकांना सदनिका वितरीत कराव्यात, या मागणीसाठी शहरातील विविध राजकीय व सामाजिक संघटनांनी पालिका भवनावर बुधवारी (दि. १६) रोजी मोर्चा काढला. यावेळी मागण्यांचे निवेदन पालिका आयुक्त श्रावण हर्डीकर यांना देण्यात आले. आंदोलनकर्त्यांनी कृती समितीचा निषेध केला.
पालिकेच्या वतीने उद्यमनगर गट क्रमांक ७९ येथे एसआरए प्रकल्प आणि गट क्रमांक ७७ येथे पंतप्रधान आवास योजना राबविण्यात येत आहे. एसआरए गृहप्रकल्पाचे काम सुरू झाले आहे. या दोन्ही प्रकल्पाना त्या परिसरातील हाउसिंग सोसायट्यांमधील उच्चभ्रू रहिवाशांनी विरोध केला आहे. त्या मागणीसाठी त्यांनी सोमवारी (दि. १३) रोजी पालिकेवर मोर्चा काढला होता. उच्चभ्रू मंडळींच्या मागणीच्या विरोधात बुधवारी भीमशाही युवा संघटना, बहजन प्रेरणा बुद्ध सामाजिक ट्रस्ट, यशवंतराव पुनर्वसन कृती समिती, भारतीय रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाच्या अल्पसंख्याक आघाडीने पालिकेवर मोर्चा काढला होता.
एसआरए व पंतप्रधान आवास योजना कोणत्याही परिस्थितीमध्ये राबविली पाहिजे. हे काम तातडीने पूर्ण करून झोपडीधारकांना सदनिका वितरित कराव्यात, अशी मागणी अजीज शेख व इतरांनी केली.
या आंदोलनात भीमशाही युवा संघटनेचे शिवशंकर उबाळे, बहुजन प्रेरणा बुद्ध सामाजिक ट्रस्टचे फारूक कुरेशी, यशवतंराव पुनर्वसन कृती समितीचे अविनाश चौधरी, आरपीआय अल्पसंख्याक आघाडीचे अजीज शेख आदी सहभागी झाले होते.


















